वार्ताहर/ किणये
बिजगर्णी गावची ग्रामदेवता महालक्ष्मीदेवी मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला रविवार दि. 18 रोजीपासून प्रारंभ होणार आहे. तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. गावातील महालक्ष्मी मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला असून या सोहळ्यानिमित्त गावात सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. हभप विश्वनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व राजेश कुलकणा, सुभाष कुलकर्णी या पौरोहितांच्या उपस्थितीत सर्व धार्मिक विधी होणार आहेत.
बिजगर्णी, कावळेवाडी, राकसकोप या गावांतर्फे हा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. मूर्ती प्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळ्याला भुतरामट्टी येथील श्री शिवसिद्ध सोमेश्वर महास्वामी यांची उपस्थिती राहणार आहे.
रविवार दि. 18 रोजी पहाटे काकड आरती होणार आहे. सकाळी 9 वाजता गावात दिंडीची मिरवणूक होईल. यावेळी सर्व देवदेवतांची पूजाअर्चा करण्यात येणार आहे. गावात मूर्ती व कळस मिरवणूक होणार आहे. या मिरवणुकीचे उद्घाटन संदीप अष्टेकर व सुजाता अष्टेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
सोमवार दि. 19 रोजी पहाटे काकड आरती, त्यानंतर गणेश पूजन, कुमारीका पूजन, मातृका पूजन, मंडप पूजन, गोमाता पूजन, जलाधिवास आदी कार्यक्रम विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहेत. गो-माता पूजन शशिकांत मोरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे .
मंगळवार दि. 20 रोजी पहाटे काकड आरती, त्यानंतर होमहवन, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि कळसारोहण कार्यक्रम होणार आहेत. दुपारी बारा वाजता मंदिराचा उद्घाटन सोहळा होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यांना बेळगावकर हे राहणार आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दुपारी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. सोहळ्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे कळविण्यात आले आहे