भाजपकडून तेलंगणा निवडणुकीची उमेदवार जाहीर
भाजपने तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी स्वत:च्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत 35 उमेदवारांची नावे आहेत. मेडक मतदारसंघात भाजपने विजय कुमार यांना उमेदवारी दिली आहे. तर उप्पल मतदारसंघात भाजप प्रदेश उपाध्यक्ष एनव्हीएसएस प्रभाकर हे निवडणूक लढविणार आहेत. मुर्शिदाबाद येथे पूसा राजू यांना उमेदवारी मिळाली असून ते भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत. जुबली हिल्स मतदारसंघात भाजपने एल. दीपक रेड्डी यांना तिकीट दिले आहे. दीपक रेड्डी यांचा सामना काँग्रेस नेते मोहम्मद अझरुद्दीन यांच्याशी होणार आहे. अंबरपेटमध्ये कृष्णा यादव, नारायणपेटमध्ये आर. पांडु रेड्डी , नालगोंडामध्ये एम. श्रीनिवास गौड, परकल येथे पी. कालीप्रसाद यांना उमेदवारी मिळाली आहे. तर शादनगर मतदारसंघात आंदे बबीहा हे भाजपचे उमेदवार असतील.
खासदारही मैदानात
भाजपने तेलंगणा विधानसभा निवडणुकीत तीन खासदारांनाही उतरविले आहे. पक्षाच्या पहिल्या यादीत करीमनगर मतदारसंघात खासदार बंदी संजय कुमार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. बोथ मतदारसंघात खासदार सोयाम बापू तर कोरुतला येथे खासदार अरविंद धर्मपुरी हे भाजपचे उमेदवार आहेत. तर भाजप आमदार एटाला राजेंद्र हे गजवेल मतदारसंघात मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या विरोधात निवडणूक लढविणार आहेत.