उत्तरचे उमेदवार अॅड. येळ्ळूरकरांची पत्रकार परिषद : राष्ट्रीय पक्षांचा घेतला खरपूस समाचार
बेळगाव : बेळगाव उत्तर मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. नागरिकांचा मिळणारा पाठिंबा पाहून राष्ट्रीय पक्षांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. त्यामुळेच म. ए. समितीच्या उमेदवारांचा अपप्रचार केला जात आहे. ‘माघार घेणे हे आमच्या रक्तात नाही’ त्यामुळे राष्ट्रीय पक्षांनी म. ए. समितीच्या नादाला लागू नये, असा सज्जड इशारा म. ए. समितीचे बेळगाव उत्तरचे उमेदवार अॅड. अमर येळ्ळूरकर यांनी पत्रकार परिषदेतून राष्ट्रीय पक्षांना दिला. उत्तर मतदारसंघात मराठी भाषिकांची 65 हजार मते आहेत. त्याचबरोबर इतर समाजही म. ए. समितीच्या पाठीशी आहेत. विशेषत: भाजपला उत्तरमधून पराभव दिसू लागल्याने त्यांनी कुरापती सुरू केल्या आहेत. म. ए. समितीला मतदान करू नका, म. ए. समिती निवडणुकीतून माघार घेणार असल्याचा अपप्रचार केला जात आहे. परंतु, यामध्ये कोणतेही तथ्य नसून राष्ट्रीय पक्षांना म. ए. समितीमुळे धडकी भरली आहे. राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांना जाहीर आव्हान असून एकाच व्यासपीठावर या आणि चर्चा करा, असे अॅड. येळ्ळूरकर यांनी सांगितले.
बेळगाव उत्तरमध्ये आपणच विकास केला, असे भासवण्याचे काम भाजप पदाधिकारी करीत आहेत. तुम्ही जर खरोखरच विकास केला असाल तर केंद्रीयमंत्री, महाराष्ट्रातील मंत्री व नेते प्रचारासाठी का बोलावावे लागले? महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन व चित्रा वाघ हे मागील महिनाभरापासून बेळगाव उत्तरमध्ये ठाण मांडून आहेत. त्यांचे काही कार्यकर्ते समितीच्या मागावर असून त्यांना योग्यवेळी धडा शिकविला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकांच्या दरम्यान एकमेकांच्या विरोधात गरळ ओकणारे राष्ट्रीय पक्ष निवडणुका झाल्यावर मात्र एकमेकांच्या गळ्यात गळे घालतात. काही वर्षांपूर्वी महानगरपालिकेवर आपली सत्ता आणण्यासाठी काँग्रेस व भाजप हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष एकत्रित आले होते. याचे ताजे उदाहरणच हवे असल्यास हुबळी-धारवाड सेंट्रलचे उमेदवार जगदीश शेट्टर यांचेच घ्या. कट्टर हिंदुत्ववादी समजले जाणारे शेट्टर आज काँग्रेसतर्फे निवडणूक लढवत आहेत. यावर तुमच्याकडे काय उत्तरे आहेत? त्यामुळे हिंदुत्व, विकास यासारख्या गोष्टी आम्हाला शिकवू नयेत, असा इशारा त्यांनी दिला. य् ाावेळी बोलताना युवानेते शुभम शेळके म्हणाले, राष्ट्रीय पक्षांना आपला पराभव दिसू लागल्यामुळेच ते आता अपप्रचार करीत आहेत. कितीही प्रयत्न केले तरी यावेळी बेळगाव उत्तरमधून मराठी भाषिक उमेदवारालाच संधी देण्याचा निर्धार येथील मतदारांनी केला आहे. त्यामुळे अॅड. अमर येळ्ळूरकर हे बेळगाव उत्तरचे आमदार होऊन कर्नाटक विधानसभेत सीमावासियांचे प्रतिनिधित्व करणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी पियुष हावळ, माजी नगरसेवक गजानन पाटील यांसह इतर उपस्थित होते.