वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारत आणि अमेरिका यांनी संरक्षणविषयक संबंधांमध्ये अधिक दृढता आणण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी येत्या पाच वर्षांमध्ये महत्वाची पावले उचलली जाणार आहेत. औद्योगिक सहकार्य वाढविण्यावर विशेषत्वाने भर दिला जाईल. दोन्ही देशांसमोर चीनच्या वाढत्या आर्थिक आणि सामरिक महत्वाकांक्षांचे आव्हान असल्याने एकमेकांशी निकट सहकार्य करण्याची त्यांची योजना आहे.
अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टीन यांचा भारत दौरा रविवारपासून सुरु झाला. दिल्लीत त्यांचे स्वागत करण्यात आले. सोमवारी त्यांनी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्याशी व्यापक चर्चा केली. या चर्चेत संरक्षण क्षेत्रातील सहकार्य अधिक वाढविण्यासंबंधी निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जूनला अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात काही महत्वाचे संरक्षण करार दोन्ही देशांमध्ये होतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
विभागीय सुरक्षेवर चर्चा
भारत-प्रशांतीय क्षेत्र आणि हिंदी महासागर आदी भागांमधील विभागीय सुरक्षेसंबंधी दोन्ही संरक्षणमंत्र्यांची चर्चा केल्याचे समजते. संरक्षण व इतर क्षेत्रांमध्ये नव्या तंत्रज्ञानाचे संशोधन, संरक्षण साधनांचे सहउत्पादन, संरक्षण क्षेत्रातील स्टार्टअप कंपन्यांच्या वित्त आणि तंत्रज्ञान पुरवठा इत्यादी माध्यमातून दोन्ही देश एकमेकांशी अधिक दृढ संबंध प्रस्थापित करणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.
ड्रोन कराराची उत्सुकता
भारताला अमेरिकेकडून 18 अध्याधुनिक ड्रोन्स हवी आहेत. यासंबंधी अमेरिकेच्या जनरल अॅटॉमिक एरॉनॉटिकल सिस्टीम्स या कंपनीची करार करण्याची भारताची इच्छा आहे. हे ड्रोन्स चीन आणि पाकिस्ताशी असणाऱ्या सीमारेषेवर नियुक्त करण्याची भारताची योजना आहे. याशिवाय युद्ध विमानांच्या अत्याधुनिक इंजिनांचे सहउत्पादन, भूमीवरील युद्धवाहनांचे सहउत्पादन, हॉवित्झर तोफा आणि त्यांच्या दारुगोळ्याचे सहउत्पादन आदी विषयांवर गेल्या महिन्यात अमेरिकेशी चर्चा करण्यात आली होती. युद्ध विमानांच्या इंजिनांचे तंत्रज्ञानही भारताला अमेरिकेकडून हवे आहे. त्यासंबंधीही चर्चा करण्यात आली होती.
बायडेन यांच्याशी चर्चा
गेल्या वर्षीच्या मे महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन यांच्याशी चर्चा केली होती. या चर्चेत अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणाचाही विषय होता. भारत आणि अमेरिका यांच्यात सामरिक तंत्रज्ञान भागिदारी अधिक बळकट करण्याच्या मुद्द्यावर भर देण्यात आला होता.