लाभार्थी प्रतीक्षेत : निधी सुरळीत देण्याची मागणी : ऑगस्ट, सप्टेंबरचा निधीही जमा नाही
बेळगाव : अन्नभाग्य योजनेंतर्गत बीपीएल आणि अंत्योदय कार्डधारकांना प्रतिव्यक्ती 170 रुपये दिले जात आहेत. मात्र, सप्टेंबर महिना संपला तरी अद्याप सप्टेंबरचा निधी जमा करण्यात आला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ लागला आहे. काही लाभार्थ्यांचा जुलैचा निधी जमा झाला आहे. मात्र, त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबरचा निधी जमा झालेला नाही. त्यामुळे लाभार्थी प्रतीक्षेत असल्याचे दिसत आहे. अन्नभाग्य योजनेंतर्गत मासिक प्रतिव्यक्तीला पाच किलो तांदळाचे वाटप केले जात आहे. मात्र, निधी वेळेत जमा केला जात नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. सरकारने निवडणुकीदरम्यान पाच गॅरंटी योजनांची आश्वासने दिली होती. अन्नभाग्य, शक्ती, गृहलक्ष्मी, गृहज्योती या योजनांना प्रारंभ झाला आहे. मात्र, यापैकी अन्नभाग्य आणि गृहलक्ष्मीची अंमलबजावणी व्यवस्थित होत नसल्याचे दिसत आहे. अन्नभाग्य आणि गृहलक्ष्मीचा निधी लाभार्थ्यांना मिळत नसल्याने लाभार्थ्यांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शिवाय याबाबत कोणाकडे तक्रार करावी? असा प्रश्नही लाभार्थ्यांसमोर पडला आहे. अन्नभाग्य आणि गृहलक्ष्मीच्या तक्रारी निवारणासाठी हेल्पलाईन सुरू करावी, अशी मागणीही लाभार्थ्यांतून होत आहे.
सुट्या आल्याने काहीसा विलंब
सप्टेंबर महिन्यातील तांदळाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा केली जात आहे. शनिवारपासून या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. मात्र, मध्ये सुट्या आल्याने काहीसा विलंब होणार आहे. मात्र, सुटीनंतर निधी जमा होणार आहे.
– श्रीशैल कंकणवाडी (सहसंचालक, अन्न व नागरी पुरवठा खाते)