दिल्ली महिला आयोगाने (DCW) रविवारी दिल्ली पोलिसांना नोटीस बजावून भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांना महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळप्रकरणी अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच जंतरमंतरवरिल आंदोलनातून ताब्यात घेतलेल्या महिला कुस्तीपटूंची तात्काळ सुटका करण्याचेही सांगितले आहे. भाजप खासदार ब्रिजभुषण सिंग यांच्या अटकेची मागणी करून नवीन संसद भवनाकडे महिला कुस्तीपटूंनी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
दिल्ली पोलिसांनी ब्रिजभुषण सिंग विरुद्ध दोन एफआयआर दाखल केले असून त्यापैकी एक अल्पवयीन कुस्तीपटूने केलेल्या आरोपांशी संबंधित आहे. लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे, तर दुसरा प्रौढ महिला कुस्तीपटूंच्या विनयभंग आणि अपमानजनक वर्तनाशी संबंधित आहेत.
पोलिस आयुक्त संजय अरोरा यांना लिहिलेल्या पत्रात, महिला आयोगाचे प्रमुख स्वाती मालीवाल यांनी सांगितले आहे की, जंतर- मंतरवर निदर्शने करणाऱ्या महिला कुस्तीपटू आणि त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण होऊन त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे हे खूपच दुःखदायक आहे.
आपल्या निवेदनात महिला आयोगाच्या अध्यक्षांनी एका अल्पवयीन मुलीने लैंगिक छळाचा आरोप करूनही दिल्ली पोलिस एका खासदाराला अटक करु शकत नाहीत असे नमूद केले आहे. “दिल्लीमध्ये, दररोज सुमारे 6 लैंगिक अत्याचाराची प्रकरणे नोंदवली जात आहेत. प्रत्येक प्रकरणात दिल्ली पोलीस आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न करतात. मग आजपर्यंत ब्रिजभूषण सिंह यांना अटक का झाली नाही? हा घोर अन्याय नाही तर काय आहे?” असे मालीवाल यांनी सांगितले.