वृत्तसंस्था /भुवनेश्वर
आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि दिल्लीच्या शिक्षणमंत्री आतिशी यांना पुढील आठवड्यात अधिकृत भेटीसाठी ब्रिटनला जाण्यासाठी केंद्र सरकारने आवश्यक मान्यता दिली आहे. आतिशीच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने नुकतीच दिल्ली उच्च न्यायालयात ही माहिती दिली. आतिशी यांना केंब्रिज विद्यापीठामध्ये भारतातील शिक्षण व्यवस्थेसंबंधी व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले असून 15 जून रोजी हा कार्यक्रम होणार आहे. न्यायमूर्ती चंद्रधारी सिंह यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीवेळी आतिशी यांना ब्रिटनच्या दौऱ्यावर जाण्यासाठी राजकीय मंजुरी देण्यात येत असल्याचे केंद्र सरकारच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. आता हा प्रस्ताव आर्थिक व्यवहार विभागाकडे पुढील मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून त्यावर लवकरच प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.