वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
16 ऑक्टोबरला येथे होणाऱया दिल्ली हाफ मॅरेथॉनमध्ये इथिओपियाचा मुक्तार इद्रीस आणि केनियाचा फेलिक्स किपकोच व चेपताई हे प्रमुख आकर्षण राहतील.
इथिओपियाच्या मुक्तार इद्रीसने आतापर्यंत दोनवेळा 5000 मीटर धावण्याच्या शर्यतीत विश्व चॅम्पियनशिप पटकाविली आहे. आगामी दिल्ली हाफ मॅरेथॉनमध्ये 3000 मीटर धावण्याच्या शर्यतीतील विद्यमान विश्व इनडोअर चॅम्पियन इथिओपियाच्या लेमलेम हेलु, केनियाची इरेनी चेपताई तसेच 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतील 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीतील चॅम्पियन स्टिला चेसँग महिलांच्या इलाईट गटात सहभागी होणार आहेत. दिल्ली हाफ मॅरेथॉनमधील विविध गटातील विजेत्यांसाठी एकूण 268,000 अमेरिकन डॉलर्सची एकूण बक्षिसाची रक्कम राहिल. 16 ऑक्टोबर रोजी दिल्ली हाफ मॅरेथॉनला येथील जवाहरलाल नेहरु स्टेडियमपासून प्रारंभ होईल. पुरुष आणि महिलांच्या विभागातील विजेत्याला प्रत्येकी 27,000 अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस दिले जाईल. त्याशिवाय या स्पर्धेत विक्रम करणाऱया खेळाडूला बोनस म्हणून 12,000 डॉलर्सची रक्कम अधिक दिली जाईल. 2020 साली झालेल्या दिल्ली हाफ मॅरेथॉनमध्ये प्रथमच सहभागी होणाऱया इद्रीसला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.