हिंदू जनजागृतीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : व्हॅलेंटाईन डेच्या नावाखाली समाजामध्ये विकृतपणा चालला आहे. पाश्चात्य देशातील संस्कृती भारतात प्रवेश करत आहे. मात्र यामधून सर्वात जास्त मुलींचे नुकसान होत आहे. व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी काही तरुण अतिउत्साहाच्या भरात तरुणींवर अत्याचार केल्याच्या घटना घडल्या आहेत. याचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने व्हॅलेंटाईन डे वर बंदी घालावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्यावतीने करण्यात आली. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी अपप्रचार केला जात आहे. तो रोखणे काळाची गरज आहे. प्रेमाच्या नावाखाली विकृत संकल्पना पुढे येत आहे. यातूनच लव्ह जिहाद सारखे प्रकार घडत आहेत. तेव्हा व्हॅलेंटाईन डेवर प्रतिबंध घालावा, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
गेल्या काही वर्षांमध्ये 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. मात्र त्यामुळे हिंदू संस्कृती लुप्त होत चालली आहे. शाळा, महाविद्यालय परिसरात हा प्रकार अधिक घडत आहे. त्यामुळे शैक्षणिक वातावरण बिघडत चालले आहे. असा अपप्रचार टाळण्यासाठी विविध संघ-संस्था पुढे येत आहेत. पोलिसांनीही अशा व्हॅलेंटाईन डेवर बंदी घालावी, अशी मागणीदेखील या निवेदनात करण्यात आली आहे. व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी परवानगी देऊ नये. शाळा, महाविद्यालय परिसरात गैरप्रकार होऊ नयेत यासाठी त्या ठिकाणी बंदोबस्त ठेवावा. याचबराब्sार शाळा, महाविद्यालयाच्या प्राचार्य तसेच प्राध्यापकांनादेखील माहिती द्यावी. जेणे करून व्हॅलेंटाईन डे साजरा केला जाणार नाही यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कोमल मुदनूर, सविता बोंगाळे, मिलन पवार, प्रचिती हळदणकर, प्रसाद हळदणकर, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.