सदाशिवनगरमधील रहिवाशांचे मनपाला निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध ठिकाणी विकासकामे राबविण्यात येत आहेत. सदाशिवनगर परिसरातील गटारीचे बांधकाम आणि फुटपाथ निर्माण करण्यात येत आहे. मात्र येथील दुसरा मेन दुसरा क्रॉस येथे गटार बांधण्यासाठी अतिक्रमण हटवून घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे अतिक्रमण हटवून गटार बांधकाम करावे, अशा मागणीचे निवेदन महापालिकेला देण्यात आले आहे.
स्मार्ट सिटी योजनेमधून तसेच महापालिकेच्या अनुदानातून सदाशिवनगर परिसरात गटारीचे बांधकाम आणि रस्त्याचा विकास केला जात आहे. सदाशिवनगरमधील बँक ऑफ महाराष्ट्र ते लक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या रस्त्याशेजारी गटार बांधण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. तसेच पेव्हर्स घालून फुटपाथ केले जाणार आहेत. मात्र दुसरा मेन दुसरा क्रॉस येथे एका चहाविपेत्याने दोन मीटर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे सदर गटार रस्त्यावर बांधावे लागणार आहे. या परिसराचे सर्वेक्षण करून अतिक्रमण हटविण्यात यावे, तसेच गटारीचे बांधकाम करावे, अशा मागणीचे निवेदन महापालिकेकडे देण्यात आले आहे. महापालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देवून गटारीचे बांधकाम करण्यासाठी तातडीने कारवाई करावी, अशी विनंती निवेदनाद्वारे केली आहे.