मनपा आयुक्तांना निवेदन : अतिक्रमण हटवून कारवाई करण्याची गरज
बेळगाव : हुतात्मा चौकजवळील कावेरी कोल्ड्रिंक्सच्या बाजूला असलेल्या बोळामध्ये विद्युतखांब रस्त्याच्या मधोमधच उभारण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी अतिक्रमण करून इमारत उभी केली जात आहे. तरी ‘तो’ विद्युतखांब हटवून अतिक्रमणही हटवावे, यासाठी या परिसरातील नागरिकांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. मारुती गल्ली, गणपत गल्ली आणि कडोलकर गल्लीला हे बोळ जोडले गेले आहे. या बोळामधून दुचाकीस्वार, नागरिकही ये-जा करतात. मात्र आता रस्त्याच्या मधोमध विद्युतखांब बसविण्यात आला आहे. त्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. तेव्हा तातडीने ‘तो’ खांब हटवावा, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.nदरम्यान या ठिकाणी नवीन इमारत उभी करण्यात येत आहे. तीही अतिक्रमण करूनच उभारली जात आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने त्या ठिकाणी भेट देऊन ते अतिक्रमण हटवावे, असेही या निवेदनात म्हटले आहे. बेकायदेशीररित्या हे काम सुरू असून त्याची चौकशी करावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. माजी नगरसेवक माया कडोलकर, भैरू पाटील, विनोद कडोलकर, एन. के. ताशिलदार, ए. बी. केंगेरी, एस. जी. हलगी, सुनील बाडीवाले, राजू जाधव, परशरामसिंग रजपूत यांच्यासह इतर नागरिकांच्या या निवेदनावर सह्या आहेत.