पाच राज्यात प्रभावी कामगिरी करून जागा वाढवण्याचा प्रयत्न
वृत्तसंस्था / हैदराबाद
लोकसभा निवडणुकीपूर्वी 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून त्या झाल्यानंतर विरोधी पक्षांच्या आघाडीने जागावाटप करावे, अशी सूचना काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत अनेक सदस्यांनी केली आहे. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीची बैठक हैदराबादमध्ये पार पडली असून या बैठकीत काँग्रेसच्या धोरणांसंबंधी चर्चा करण्यात आली.
2024 ची लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. मात्र, या निवडणुकीपूर्वी तेलंगणा, छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. सध्या राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथे काँग्रेसची सरकारे आहेत. काँग्रेसला आता वातावरण अनुकूल बनत आहे, असा विश्वास कार्यकारिणीच्या अनेक सदस्यांनी व्यक्त केला आहे. या राज्यांमध्ये काँग्रेसची कामगिरी चांगली झाली, तर लोकसभेच्या निवडणुकीत अधिक जागांवर दावा सांगता येईल, असा काँग्रेसश्रेष्ठींचाही विचार असल्याचे बोलले जात आहे.
जागावाटपाचा प्रश्न जटील
काँग्रेससह 24 विरोधी पक्षांनी एकत्र येऊन संयुक्त आघाडी तयार केली आहे. या ‘इंडिया’ आघाडीच्या आतापर्यंत चार बैठका झाल्या आहेत. मात्र, जागावाटपाचा मुख्य प्रश्न अद्याप सुटलेला नाही. आघाडीच्या घटक पक्षांमध्ये जागावाटपासंदर्भात स्पर्धा असल्याचे दिसून येते. त्यामुळे काँग्रेसला कमी जागा लढविण्यावर समाधान मानावे लागेल, असे दिसून येत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुका झाल्यानंतर जागावाटप करावे, असा सूर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठक उमटत आहे.
अन्य पक्षांना हवे लवकर जागावाटप
उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्ष आणि पंजाब व दिल्लीतील आम आदमी पक्ष यांना सप्टेंबरच्या अखेरपर्यंत जागा वाटपावर निर्णय हवा आहे. ते विधानसभा निवडणुका होईर्पंत वाट पाहण्यास तयार नाहीत. ममता बॅनर्जी आणि नितीशकुमार यांचेही म्हणणे लवकरात लवकर जागावाटप करावे, असे आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षांची आघाडी यातून मार्ग कसा काढणार हे लवकरच समजणार आहे.