प्रेषित मोहम्मद यांच्यावर टिप्पणी, संशयिताला अटक करण्याची मागणी
प्रतिनिधी/ पणजी, म्हापसा, मडगाव
सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेषित मोहम्मद तसेच अल्ला यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविऊद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करत राज्यातील पणजी, म्हापसा, फोंडा, मडगाव तसेच अन्य काही पोलीस स्थानकावर शनिवारी मुस्लिमबांधवांनी निदर्शने केली. याबाबत शुक्रवारी सायंकाळी तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या, मात्र कुणालाही अटक करण्यात आली नव्हती. या प्रकारामुळे पोलीस स्थानकावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
आंदोलकांनी संशयितांना अटक करण्यात दिरंगाई केल्याबद्दल निषेध व्यक्त केला असून, केवळ आंदोलनकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र संशयिताला अटक केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सायबर गुन्हा विभाग आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अज्ञात व्यक्तीला पकडण्याचे काम करत आहे. याबाबत गुन्हा नोंद केला आहे. दाखल झालेल्या गुह्याची कसून चौकशी करण्यासाठी दक्षिण जिल्हा सायबर विशेष टीम तयार करण्यात आली आहे, असेही पोलिसांनी सांगितले.
म्हापशात तणाव
म्हापसा येथील ‘अहले सुन्नत जमातुल मुस्लिमीन’ या संघटनेने म्हापसा पोलीस स्थानकाचे निरीक्षक सीताकांत नायक यांना तक्रारीचे निवेदन सादर करीत दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. सुमारे दोनशेहून अधिक मुस्लिम बांधवांनी स्थानकाबाहेर दुपारी गर्दी केली होती. यावेळी काही काळ येथे वातावरण तंग झाले. सचिव अन्वर इस्माईल बेपारी यांनी याबाबत म्हापसा पोलीस स्थानकात लेखी तक्रार दिली आहे. या तक्रारीच्या प्रती म्हापसा पोलीस निरीक्षक, उपअधीक्षक, अधीक्षक, मुख्यसचिव, आमदार, मुख्यमंत्र्यांना देण्यात आल्या आहेत.
मडगाव पोलीस स्थानकासमोरही निदर्शने
धार्मिक भावना दुखविणाऱ्या अज्ञात संशयिताविरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी करीत मडगाव पोलीस स्थानकासमोरही शनिवारी मुस्लिमबांधवांनी निदर्शने केली.
सदर पोस्ट व्हायरल केलेल्या अज्ञात संशयिताविरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी निदर्शक करीत होते. या आक्षेपार्ह ‘पोस्टा’संबंधी मडगाव पोलीस स्थानकात शुक्रवारी तक्रार करण्यात आलेली आहे.
धार्मिक भावना दुखावणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हल्लींच विधान केल्याच्या पार्श्वभूमीवर प्रस्तुत प्रकरणातही अज्ञात आरोपीविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मडगाव पोलीस स्थानकासमोर निदर्शक करीत होते