प्रतिनिधी/ बेळगाव
बंटवाळ, जि. मंगळूर येथील पोलीस उपअधीक्षक प्रतापसिंग थोरात यांना पोलीस दलातील उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपतिपदक जाहीर झाले आहे. गेली 28 वर्षे पोलीस दलात सेवा बजावणाऱया प्रतापसिंग यांचा गौरव करण्यात आला आहे.
बेळगाव, बिदर, बळ्ळारीबरोबरच बेंगळूर सेंट्रल क्राईम ब्रँचमध्ये त्यांनी सेवा बजावली आहे. अंतर्गत सुरक्षा विभागातही प्रतापसिंग यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून बळ्ळारी येथे सेवा बजावताना आंध्रप्रदेशमधील नक्षल नेता कुद्रपट्टी नरसिंह रेड्डी याचा एन्काऊंटरमध्ये खात्मा केला होता.
अंतर्गत सुरक्षा विभागात तब्बल सहा वर्षे सेवा बजावणाऱया प्रतापसिंग यांनी दांडेली येथेही काम केले आहे. सध्या मंगळूर जिल्हय़ातील बंटवाळ उपविभागात पोलीस उपअधीक्षक म्हणून सेवा बजावणाऱया प्रतापसिंग यांचे बेळगावशी जवळचे नाते आहे.