मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची जिल्हा प्रशासनाला सूचना : विमानतळाच्या विकासासाठी वरिष्ठ पातळीवरील बैठक
बेळगाव : बेळगाव येथील सांबरा विमानतळासाठी यापूर्वी शेतकऱ्यांनी पुरेशी जमीन दिली आहे. विमानतळाचा विकास करण्यासाठी आमचा कोणताही विरोध नाही. परंतु सांबरा परिसरातील शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच विमानतळाचे विस्तारीकरण करावे, असा इशारा महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिला. बेळगाव विमानतळ विकासासाठी मंगळवारी बेळगाव विमानतळावर वरिष्ठ पातळीवरील बैठक पार पडली. या बैठकीला पालकमंत्र्यांसह लोकप्रतिनिधी आणि अधिकारीवर्ग उपस्थित होता. बेळगाव विमानतळाचे विस्तारीकरण व विकास केला जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारने भरीव निधीही मंजूर केला आहे. परंतु विस्तारीकरणासाठी जागेची आवश्यकता भासणार असल्याने कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय न करता अथवा परिसरातील घरांना धोका न पोहोचविता विकासकामे राबवावीत, अशी सूचना हेब्बाळकर यांनी मांडली.
विमानतळ संचालक त्यागराजन यांनी उपस्थितांचे स्वागत करत विमानतळाचा विकास कशा पद्धतीने होणार आहे, याची माहिती दिली. मुख्य धावपट्टीसह टर्मिनल बिल्डिंगमध्ये वाढ केल्याने भविष्यात विमानतळाची व्याप्ती वाढेल, असे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी प्रस्तावित नकाशा मान्यवरांना दाखविला. पालकमंत्री जारकीहोळी यांनी अधिकारीवर्गाला सूचना केल्या. बैठकीला राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, आमदार राजू सेठ, पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा, मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांसह विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.