मिथील ढवळीकर यांची माहिती : रस्ते, भूमिगत वीज वाहिन्या, कचरा प्रकल्पांचा समावेश
वार्ताहर /मडकई
मडकई मतदार संघात मागील 23 वर्षांमध्ये विकासाचा प्रवाह अखंडपणे सुरु आहे. आमदार व वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सर्वच क्षेत्रात अमुलाग्र बदल घडविल्याने विक्रमी मताधिक्क्याने ते विजयी होत आहेत. मात्र कोराना काळात काही विकास होऊ शकला नाही, हे मान्य आहे. मडकईतील सर्व रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण, भूमीगत वीज वाहिन्या, सौर उर्जा प्रकल्प, मैदाने, मलनिस्सारण प्रकल्प, कचरा प्रकल्प अशा महत्त्वाच्या प्रकल्पांना चालना मिळाली आहे. मार्च अखेर पर्यत ही सर्व विकासकामे पूर्णत्वास येतील, अशी माहिती मगो युवा नेते व माधवराव ढवळीकर ट्रस्टचे संचालक मिथील ढवळीकर यांनी दिली.
यावेळी बांदोडाचे सरपंच सुखानंद कुर्पासकर, मडकईचे सरपंच शैलेंद्र पणजीकर, वाडी तळावलीच्या सरपंच वसुंधरा येसो सावंत तळावलीकर, कवळेच्या सरपंच मनुजा नाईक, आडपई दुर्भाटच्या सरपंच क्षिप्रा मशाल आडपईकर, कुंडईचे सर्वेश कुंडईकर आदी उपस्थित होते. मडकईतील रस्त्यांच्या हॉटमिक्स डांबरीकरणाच्या निवादा निघालेल्या आहेत. पाऊस संपताच या कामाला सुरुवात होईल, असे त्यांनी सांगितले.
प्रत्येक पंचायतीमध्ये कचरा शेड
मतदार संघासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला कचरा प्रकल्प प्रत्येक पंचायत क्षेत्रात माधवराव ढवळीकर ट्रस्टतर्फे राबविण्याचे काम सुरू आहे. कवळे व कुंडई पंचायतीत हे काम पूर्णत्वास आले आहे. घरोघरी कचरा गोळा करण्याचे काम सुरू आहे. कवळे येथे कचऱयासाठी दुसरी शेड उभारण्यासाठी जागा पाहण्यात आली आहे. कायदेशीर सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर ही शेड उभारुन हा प्रकल्प स्थलांतरीत केला जाईल. तसेच बांदोडा, मडकई, वाडी तळावली, दुर्भाट आगापूर आदी पंचायत क्षेत्रात कचरा शेड्स ट्रस्टतर्फे बांधण्यात येतील. ट्रस्टतर्फे वाहने व कचरा गोळा करण्यासाठी कामगारांची सोय केलेली आहे.
भूमीगत वाहिन्या व सौर उर्जा
भूमीगत वीज वाहिन्यांच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात झाली आहे. टप्याटप्याने प्रत्येक पंचायत क्षेत्रात ही कामे सुरू राहणार आहेत. त्यामुळे पावसाळय़ात वीज वाहिन्यांवर वृक्ष कोसळून खंडित होणाऱया वीजपुरवठय़ाला पूर्णविराम मिळणार आहे. मडकई मतदार संघातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांवर खंडित वीज पुरवठय़ाचा परिणाम होत होता. त्यामुळे सौर उर्जा देण्याच्या प्रक्रियेला सुरूवातही झालेली आहे. विद्यालयातून या सौर उर्जेसाठी जसे प्रस्ताव येतील त्यानुसार संबधीत विद्यालयात ही सोय केली जाईल. आवश्यक ठिकाणी ट्रार्न्स्फोमर उभारलेले आहेत. अजूनही उच्च दाबाचे ट्रान्स्फॉर्मर उभारून विजेचा प्रश्न कायम निकालत काढला जाईल.
मतदारसंघ बेरोजारी मुक्त करण्याचा प्रयत्न
मतदार संघातील बेरोजकारी हटविण्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचे पूर्वीपासून प्रयत्न सुरू आहेत. सरकारी नोकरी देताना मडकई व कुंडई या दोन पंचायत क्षेत्रात असलेल्या औद्योगीक वसाहतीमध्ये नोकऱया देण्याचे काम सुरूच आहे. मात्र नोकरीसाठी आवश्यक ते कौशल्य नसल्यास अन्य मतदार संघातील व बिगर गोमंतकीयांना नोकऱया त्या आस्थापनाना द्याव्या लागलेल्या आहेत. त्याचा विचार करून ते कौशल्य मतदार संघातील युवावर्गाला कसे मिळावे यावर त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. औद्योगीक वसाहतीचा दर्जा वाढविण्यावर भर देऊन नवीन आस्थापनाना निमंत्रीत करून नोकऱया देऊन मडकई मतदार संघ टप्याप्याने बेरोजगारीपासून मुक्त करण्याचा मंत्री सुदिन ढवळीकर यांचा मानस आहे.
तळावली व दुर्भाट पंचायत घरांचे विस्तारीकरण
वाडी तळावली व दुर्भाट आगापूर ही पंचायत घरे अडगळीच्या ठिकणी असल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. याची जाण व भान मंत्री सुदिन ढवळीकरांना आहे. त्यासाठी या पंचायत घरांचे विस्तारीकरण व्हावे म्हणून त्यांचे सुरूवातीपासूनच प्रयत्न सुरू होते. मात्र जागेअभावी ही दोन्ही पंचायत घरे पडून राहिली. पंचायत इमारत उभारण्यासाठी स्वतंत्र भूखंड पाहिला असून कायदेशीर सोपस्काराचे काम ही अंतीम टप्यात आहे. दुसऱया पंचायतीसाठी अजून सोयिस्कर जागा उपलब्ध होत नाही. पण तेही प्रयत्न सुरूच असल्यामुळे ही दोन्ही पंचायत घरे स्वतंत्रपणे उभी राहणार आहे.
वाडी तळावली, दुर्भाट, आगापूर, पाटणे, गावणे, वडाळ आदी भागातील रस्त्यांच्या दोन्ही बाजूला दाटीवाटीने घरे असल्याने या रस्त्यांचे रूंदीकरण करणे शक्य होत नाही. त्यासाठी पर्यांयी रस्ते काढण्यासाठी मंत्री ढवळीकरांचे प्रयत्न सुरूच आहेत. मात्र नागरिकांनीही या कामी सहकार्य करण्याचे आवाहन मिथील ढवळीकर यांनी केले.
कवळे येथील मलनिस्सारण प्रकल्प पूर्णत्वास आलेला आहे. उंडीर भागातील मलनिस्सारणाचे काम लवकरच हाती घेतले जाईल, तर दुर्भाटच्या मलनिस्सारणला चालना देताना कासवाडा येथील काही घरांच्या न्हाणी घरातील पाणी थेट गटारात सोडले जाते. ते बंद करून लवकरच त्यांना या मलनिस्सारणातून जोडण्या दिल्या जातील. बांदोडयातील स्व. भाऊसाहेब बांदोडकर मैदानाचे टर्फ बदलून नवीन घातले जाईल. मडकईचे मैदान लवकरच पूर्णत्त्वास नेले जाईल. पाण्याची समस्या ही सोडविण्यात येणार आहे, अशी माहीती बांदोडाचे सरपंच सुखानंद कुर्पासकर, मडकईचे सरपंच शैलेंद्र पणजीकर व आडपईच्या सरपंचा क्षिप्रा आडपईकर यांनी दिली.