मलप्रभा नदी घाटावर गंगा आरती : महिला भाविकांची उपस्थिती लक्षणीय
खानापूर : तालुक्यात महाशिवरात्रनिमित्त मलप्रभा नदीघाट व असोगा रामलिंगेश्वर मंदिर परिसरात तसेच हब्बनहट्टी तीर्थक्षेत्रावर स्नानासाठी भाविकांची गर्दी झाली होती. तालुक्यातील नाथपंथीयांच्या डोंगरगाव, किरावळे, बाळेवाडी व हंडिभडगनाथ या मठावर भाविकांनी गर्दी केली होती. तसेच सोमवार दि. 20 रोजी सोमवती आमावस्या असल्याने या दिवशीही अनेक ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. रविवारी सर्वच क्षेत्रावर महाप्रसादाचे आयोजन केले होते. शनिवारी पहिल्यांदाचा खानापूर येथे शिवरात्रीनिमित्त गंगा आरतीचे आयोजन केले होते. खानापूर तालुक्यातील जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या मलप्रभेच्या तिरी शिवरात्रीमहोत्सव शनिवारी भक्तिभावाने साजरा करण्यात आला. कणकुंबी येथील माउली मंदिर, हब्बनहट्टी येथील स्वयंभू हनुमान मंदिर, असोगा येथील रामलिंगेश्वर मंदिर, खानापूर मलप्रभा घाटातील महादेव मंदिर तसेच नाथपंथीयांचे मठ असलेले डोंगरगाव, हंडिभडगनाथ, बाळेवाडी, किरावळे या मठावर महाशिवरात्रीनिमित्त धार्मिक विधी करण्यात आले. या ठिकाणी रात्रभर जागर करून भजन व पूजापाठ करण्यात आले. तर रविवारी सकाळी धार्मिक विधी आटोपल्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला. य् ाावर्षी खानापूर शहरातील मलप्रभा नदी घाटावर महाशिवरात्रीनिमित्त मलप्रभा नदीघाट परिसरात खेड्यापाड्यातील भाविकांनी पवित्र स्नानासाठी गर्दी केली होती. ऊमेवाडी क्रॉसपासून नदीपर्यंत दुकांनाची गर्दी झाली होती.
शिवरात्रीनिमित्त पर्यावरण गतीविधी दत्त पीठ कुंडई यांच्यावतीने पहिल्यांदाच काशी गंगा आरतीच्या धर्तीवर गंगा आरती आयोजित केली होती. यासाठी मोठ्या प्रमाणात महिलांनी गर्दी केली होती. सायंकाळी 7 वाजता या आरतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी रामनाथ नाईक, श्री शंभुलिंग शिवाचार्य स्वामीजी, डॉ. गौरीश भालकेकर, नियती फौंडेशनच्या अध्यक्षा सोनाली सरनोबत, पर्यावरण गती विधीच्या दानेश्वरी पाडेकर, वाणी रमेश उपस्थित होत्या. रामनाथ नाईक यांनी नदीचे महत्त्व तसेच नदीचे संर्वधन आणि प्रदूषण कमी करून पाण्याचे महत्त्व पटवून दिले. तर गौरीश भालकेकर यांनी हिंदू धर्मातील प्राचीन परंपरामध्ये नदीचे महत्त्व विशद केले. खानापूर शहरातील नागरिक भाग्यवान आहेत. त्यांना मलप्रभासारख्या नदीचा त्यांना सहवास लागला. यासाठी नदीचे संर्वधन करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे, असे ते म्हणाले. तसेच शंभुलिंग शिवाचार्य स्वामीजी यांनी गंगापूजनासाठी ज्यानी प्रयत्न केले त्या सर्वांचे कौतुक केले. त्यानंतर नदीची पूजा करून नदीला दिवे अर्पण केले. मंत्रघोषात गंगा आरती करण्यात आली. यावेळी नदी घाटावर हजारो भाविक महिला उपस्थित होत्या.