यशस्वी करण्यासाठी पूर्वतयारी बैठकीत आवाहन
बेळगाव : जिल्ह्यामध्ये लवकरच धनगर समाज बांधवांचा मेळावा घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नेहरूनगर येथील मेमोरिअल इंग्लिश माध्यम शाळेच्या सभागृहात अखिल भारतीय धनगर समाज बांधवांची पूर्वतयारी बैठक घेण्यात आली. यावेळी चिकोडी जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, विधानपरिषद माजी सदस्य विवेकराव पाटील, जि. पं. माजी सदस्य डॉ. राजेंद्र सन्नक्की आदींनी मार्गदर्शन केले. लवकरच आयोजित करण्यात येणाऱ्या मेळाव्याला मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी समाज बांधवांनी परिश्रम घेतले पाहिजेत, असे आवाहन मान्यवरांकडून करण्यात आले. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी हा मेळावा यशस्वी करणे आवश्यक आहे. मेळाव्याला सर्वांनी एकत्रित येऊन कार्य केले पाहिजे. जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत, असे सांगण्यात आले. यावेळी जिल्हा कुरबर संघाचे अध्यक्ष मड्याप्पा तोळण्णावर, सत्याप्पा भागण्णावर, संजयकुमार बाने, अशोक मेटगुड, विनायक बन्नट्टी, बसवराज बसलीगुंदी आदी उपस्थित होते.