वृत्तसंस्था /धरमशाला
यंदाचा वनडे विश्वचषक भारतात होणार आहे. या स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. विश्वचषकाचे 49 सामने भारतातील 10 शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. या यादीत धरमशालाचेही नाव आहे. हिमाचल प्रदेशातील धरमशाला क्रिकेट स्टेडियम जगातील सर्वात सुंदर स्टेडियमपैकी एक आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने विश्वचषकापूर्वी या स्टेडियमचे नूतनीकरण केले आहे. विश्वचषक स्पर्धेपूर्वी बीसीसीआयने अनेक स्टेडियमचे नूतनीकरण केले आहे. बोर्डाने प्रत्येक स्टेडियमसाठी भरघोस बजेट दिले होते. या यादीत हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमचाही समावेश आहे. धरमशाला स्टेडियममध्ये नवीन गवताची लागवड करण्यात आली आहे. आऊटफिल्ड पूर्वीपेक्षा खूपच चांगले झाले आहे. ड्रेसिंग रूम आणि प्रेक्षकांसाठी व्यवस्था वाढवण्यात आली आहे. ड्रेसिंग रुममध्येही काही बदल करण्यात आले आहेत. दरम्यान, बीसीसीआयने स्टेडियमचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. नव्याने सजलेल्या या स्टेडियमचा लूक चाहत्यांना चांगलाच आवडला असून अनेकांनी याला पसंती दिली आहे. विश्वचषकाचे 5 सामने धरमशाला येथे खेळवले जाणार आहेत. येथील पहिला सामना बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यात 7 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यानंतर 10 ऑक्टोबरला इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यात सामना होणार आहे. 17 ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्यातील सामना होणार आहे. भारताचा या मैदानावर एक सामना खेळणार आहे. 22 ऑक्टोबरला भारताचा सामना न्यूझीलंडशी धरमशाला येथेच होणार आहे. 28 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे.