वृत्तसंस्था/ दुबई
ऑक्टोबर महिन्यात भारतात सुरू होणाऱ्या 2023 च्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत कुमार धर्मसेना आणि नितीन मेनन यांची मैदानावरील पंच म्हणून नियुक्ती केली आहे. 5 ऑक्टोबर रोजी या स्पर्धेतील न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील हा सलामीचा सामना राहील. सदर सामना अहमदाबादमध्ये खेळविला जाईल.
सदर स्पर्धेसाठी आयसीसीने विविध पंच आणि सामनाधिकारी यांची घोषणा केली आहे. 4 वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील यजमान इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामन्याच्या आठवणी आजही ताज्या आहेत. 5 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील हा सलामीचा सामना प्राथमिक फेरीतील राहील. कुमार धर्मसेना आणि नितीन मेनन हे या सामन्यासाठी मैदानावरील पंच राहतील. पॉल विल्सन हे टीव्ही पंच म्हणून तर शाहीद सैकेत चौथे पंच त्याचप्रमाणे भारताचा माजी वेगवान गोलंदाज जावगल श्रीनाथ हे सामनाधिकारी म्हणून राहतील. लंकेच्या कुमार धर्मसेना यांनी 2015 साली नवा आगळा इतिहास घडविला होता. 2015 च्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात कुमार धर्मसेना यांनी खेळाडू आणि पंच अशी दुहेरी भूमिका वठविली होती. 2023 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत शाहीद सैकेत हे पंचगिरी करणारे बांगलादेशचे पहिले पंच आहेत.
या स्पर्धेसाठी आयसीसीच्या पंचांच्या इलाईट पॅनेलमधून 12 पंचांचा समावेश आयसीसीच्या घोषित करण्यात आलेल्या पंचांच्या यादीत समावेश आहे. ही यादी एकूण 20 जणांची असून त्यामध्ये 16 पंच आणि 4 सामनाधिकारी यांचा समावेश आहे. इंग्लंडमध्ये 4 वर्षांपूर्वी झालेल्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पंचगिरी करणाऱ्या 3 पंचांचे पुनरागमन झाले आहे. त्याचप्रमाणे 2022 साली झालेल्या ऑस्ट्रेलियातील आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पंचगिरी करणाऱ्या 14 पंचांना पुन्हा 2023 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी संधी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत शाहीद सैकेत आणि अॅलेक्स वेर्फ यांचा सहभाग नव्हता. लंकेचे कुमार धर्मसेना, इरासमुस व रिचर्ड किटलबॉरो यांचे या आगामी स्पर्धेत पुनरागमन झाले आहे. 2019 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत लॉर्डस् मैदानावर झालेल्या यजमान इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामन्यात इरासमुस आणि धर्मसेना यांनी पंचगिरी केली होती. रॉड टकेर यांची तृतीय पंच म्हणून निवड करण्यात आली आहे. ख्रिस गॅफेनी, मिचेल गॉ, पॉल रायफल, रिचर्ड इलिंगवर्थ, जोयेल विल्सन, नितीन मेनन यांचेही या आगामी स्पर्धेत पुनरागमन होत आहे. भारताचे नितीन मेनन हे या आगामी स्पर्धेतील सर्वात कमी वयाचे पंच म्हणून राहतील. वयाच्या 39 व्या वर्षी मेनन यांना पुन्हा आयसीसीने संधी दिली आहे. शाहीद सैकेत, एहसान रझा, अॅड्रीयन होल्डस्टॉक, वेर्फ आणि ख्रिस ब्राऊन यांचे या आगामी स्पर्धेत पंच म्हणून पदार्पण राहील. जेफ क्रो, अँडी पायक्रॉफ्ट, रिची रिचर्डसन आणि जवागल श्रीनाथ हे चार सामनाधिकारी म्हणून कार्यरत राहतील.
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी पंच, सामनाधिकारी जाहीर
या आगामी स्पर्धेसाठी आयसीसीच्या इलाईट पॅनेल यादीमध्ये न्यूझीलंडचे ख्रिस ब्राऊन, लंकेचे कुमार धर्मसेना, दक्षिण आफ्रिकेचे इरासमुस, न्यूझीलंडचे गॅफेनी, इंग्लंडचे मायकेल गॉ, दक्षिण आफ्रिकेचे अॅड्रीयन होल्डस्टॉक, इंग्लंडचे रिचर्ड इलिंगवर्थ, इंग्लंडचे रिचर्ड किटलबॉरो, भारताचे नितीन मेनन, पाकचे एहसान रझा, ऑस्ट्रेलियाचे पॉल रायफल, बांगलादेशचे एस. शाहीद, ऑस्ट्रेलियाचे रॉडनी टकेर, इंग्लंडचे अॅलेक्स वेर्फ, विंडीजचे जोयल विल्सन, ऑस्ट्रेलियाचे पॉल विल्सन हे पंच म्हणून राहतील. जेफ क्रो, झिंबाब्वेचे पायक्रॉफ्ट, विंडीजचे रिची रिचर्डसन आणि भारताचे जावगल श्रीनाथ हे सामनाधिकारी म्हणून राहतील.