धोनीसाठी चाहत्यांनी रेल्वे स्टेशनवर काढली रात्र, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
भारतीयाचं क्रिकेट वेड हे जगजाहीर आहे. क्रिकेट धर्म असेल तर महेंद्रसिंह धोनी हा काही क्रिकेटचाहत्यांसाठी देव आहे. यावरुन चाहत्यांमध्ये धोनीबाबत असलेला आदर दिसून येतो. धोनीचा हा आयपीएलमधील अखेरचा सामना असू शकतो, असं समजून देशभरातून चाहते अहमदाबाद येथे आले आहेत. चाहत्यांनी जीवाची बाजी लावून फायनलची तिकीट मिळवली. मात्र रविवारी 28 मे रोजी पावसामुळे चेन्नई विरुद्ध गुजरात यांच्यात अंतिम सामना होऊ शकला नाही. त्यामुळे 29 मे रोजी राखीव दिवशी हा महामुकाबला होणार आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या पावसामुळे क्रिकेट चाहत्यांची तारांबळ उडाली. ज्याला जिथे मिळेल तिथे आडोशाला उभा राहिला. पाऊस झाला म्हणून या चाहत्यांनी अहमदाबाद रेल्वे स्टेशनवरच रात्र काढली. जिथे जागा मिळेल तिथे चाहत्यांनी अंग टाकले. अहमदाबाद स्टेशनवरील क्रिकेट चाहत्यांचा फोटो आणि व्हीडिओ तरुणाने शेअर केले असून याला मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळाले आहेत. ही छायाचित्रे सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहेत. बीसीसीआयने जरी सामना राखीव दिवसावर ठेवला असला तरी कालची तिकीटे आजच्या सामन्यासाठी ग्राह्य धरणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे चेन्नईच्या काही चाहत्यांनी मोटेरामध्ये थांबण्याचा निर्णय घेतला. चेन्नईची जर्सी घातलेले अनेक प्रेक्षक हे रेल्वे स्टेशनवर झोपल्याचे दिसले.
धोनीची क्रेझ
दरम्यान, पावसाच्या व्यत्ययानंतर सोमवारी आयपीएलची फायनल झाली. मोठ्या संख्येने चाहते आपापल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी संघाच्या जर्सीमध्ये दिसले. चेन्नई संघाचे समर्थक धोनी-धोनी असा जयघोष करत होते, तर गुजरातचे चाहते पंड्या-पंड्याच्या नावाचा जयघोष करत होते. मात्र, स्टेडियमबाहेर मोठ्या संख्येने चेन्नई संघाचे चाहते संघाच्या टी-शर्टमध्ये धोनीचा जयजयकार करताना दिसले. चेन्नईचा संघ मैदानाकडे येत असताना रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. रस्त्यावर चेन्नईच्या चाहत्यांचा गराडा मोठ्या प्रमाणात होता. चेन्नईच्या बसला वाट मोकळी करुन देण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पिवळे वादळ दिसत आहे. यंदाच्या हंगामात प्रत्येक मैदानात चेन्नईला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला. गुजरात, मुंबई, कोलकाता असो अथवा कोणतेही शहर… प्रत्येक शहरात चेन्नईच्या चाहत्यांची गर्दी उसंडली असल्याचे चित्र पहायला मिळाले.