पंचायत निवडणुकीत तृणमूलला सर्वाधिक जागा : भाजप, डावे पक्ष पिछाडीवर
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगाल पंचायत निवडणुकीच्या निकालात तृणमूल काँग्रेस (टीएमसी) दणदणीत विजय संपादन केला आहे. बुधवारपर्यंत झालेल्या मतमोजणीनंतर जाहीर झालेल्या निकालांमध्ये टीएमसीने निर्विवाद आघाडी घेतली आहे. पंचायत निवडणुकीची मतमोजणी मंगळवार, 11 जुलै सकाळी सुरू झाल्यानंतर बुधवारपर्यंत सुरूच होती. सायंकाळपर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, टीएमसीने ग्रामपंचायतीच्या 34 हजारहून अधिक जागा जिंकल्या आहेत. दुसरीकडे, भाजप साडेनऊ हजारहून अधिक जागांवर विजय संपादन केला आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेतही ममतादीदींचाच पक्ष पुढे आहे.
पश्चिम बंगालमध्ये 8 आणि 9 जुलै रोजी एकूण 63,229 ग्रामपंचायतीच्या जागांसाठी निवडणूक झाली. पश्चिम बंगालमधील ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीची मतमोजणी बुधवारी दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. अंतिम निकाल सायंकाळपर्यंत आला नव्हता. बुधवारी दुपारी 1 वाजेपर्यंतच्या राज्य निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, टीएमसीने 63,229 ग्रामपंचायतीपैकी 34,694 जागांवर विजय मिळवला असून 677 जागांवर आघाडीवर आहे. सत्ताधारी पक्षाचा सर्वात जवळचा प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपने 9,656 जागा जिंकल्या असून 166 जागांवर आघाडीवर आहे. सीपीआय(एम) ने 2,926 जागा जिंकल्या असून 83 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसने 2,926 जागा जिंकल्या असून 83 जागांवर आघाडीवर आहे.
पंचायत समितीवरही टीएमसीचे नियंत्रण
टीएमसीने आतापर्यंत 6,335 पंचायत समितीच्या जागा जिंकल्या आहेत तर 214 जागांवर आघाडीवर आहे. भाजपने 973 जागा जिंकल्या असून 48 जागांवर आघाडीवर आहे, तर सीपीआय(एम) 173 जागा जिंकून 16 इतर जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसने 258 जागा जिंकल्या असून 7 जागांवर आघाडीवर आहे. पंचायत समितीच्या 9,728 जागांसाठी निवडणूक झाली आहे.
याशिवाय, टीएमसीने आतापर्यंत 635 जिल्हा परिषदेच्या जागा जिंकल्या आहेत आणि इतर 164 जागांवर आघाडीवर आहे. भाजपने 21 जागा जिंकल्या असून 6 जागांवर आघाडीवर आहे. सीपीआय(एम) 2 जागा जिंकून 1 जागेवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 6 जागा जिंकून 6 वर आघाडीवर आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण 928 जागा आहेत.
ममता बॅनर्जी यांनी मानले जनतेचे आभार
तृणमूल काँग्रेसने आपला विजय हा जनतेचा विजय असल्याचे स्पष्ट करत विरोधकांवर हिंसाचाराचा आरोप केला.