मुख्यमंत्र्यांच्या नावाने शेतकऱ्यांचे निवेदन
बेळगाव : बळ्ळारी नाल्याची खोदाई करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनाही या नाल्याची खोदाई करावी, यासाठी बेळगाव शेतकरी संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले आहे. येळ्ळूर रस्त्यापासून ते मुचंडी गावापर्यंत या बळ्ळारी नाल्याची खोदाई होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या नाल्यामध्ये जलपर्णी वाढली आहे तसेच ड्रेनेजचे पाणीही सोडण्यात आले आहे. यावर्षी तर शहरातील कचरा मोठ्या प्रमाणात या नाल्यामध्ये फेकण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षी पावसाळ्यात शिवाराला मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. बळ्ळारी नाल्याच्या परिसरातून शिवाराला दरवर्षीच फटका बसत आहे. एक हजारांहून अधिक एकरातील पिकांचे नुकसान होत आहे. या परिसरात अत्यंत सुपीक जमीन आहे. बासमती, इंद्रायणी यासह इतर पिके घेतली जातात. मात्र पाण्यामुळे ती सर्व पिके खराब होत आहेत. तेव्हा तातडीने या नाल्यातील गाळ काढणे आवश्यक आहे. मुचंडी जवळ मोठ्या प्रमाणत खडक आहेत. त्या खडकामुळे पाण्याचा निचरा होणे अवघड जात आहे. तेव्हा तो खडक हटविणे गरजेचे आहे. खडक फोडून नाल्याची खोली व रुंदी वाढविल्यास काही प्रमाणात पाण्याचा निचरा होण्याची शक्यता आहे. गाळ आणि नाल्यातील घाण काढून स्वच्छता करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, पाटबंधारे मंत्री, रेल्वेमंत्री, पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नावाने हे निवेदन देण्यता आले. यावेळी नारायण सावंत, सुनील जाधव, मारुती सावंत, वसंत सावंत, विराज सावंत, एम. जी. सावंत, पी. बी. जरगे यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.