जागतिक विक्रमाची झाली नोंद
काही लोक स्वतःचे काम पूर्ण करण्यासाठी कुठलीच मर्यादा ओलांडू शकतात. कुठल्याही प्रकारचा अडथळा त्यांना त्यांच्या कामापासून रोखू शकत नाही. अशाच लोकांमध्ये आता एका महिलेचे नाव सामील झाले आहे. तिने स्वतःच्या कामाच्या जोरावर जागतिक विक्रम नोंदविला आहे. उपाशी असलेल्या व्यक्तीला अन्न मिळवून देण्यासाठी चेन्नईच्या मुलीने 30 हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे.
चेन्नईत राहणाऱया मानसा गोपालने फूड डिलिव्हरीचा असा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती सिंगापूरहून अंटार्क्टिकापर्यंत म्हणजेच 30 हजार किलोमीटरचा प्रवास करत ग्राहकाला अन्नपदार्थ पोहोचविण्यास गेली होती. या थक्क करणाऱया कामगिरीसह तिच्या नावावर जागतिक विक्रम नोंदविला गेला आहे.
स्वतःच्या इन्स्टाग्राम अकौंटवर एक व्हिडिओ शेअर करत मानसाने फूड डिलिव्हरी करण्यासाठी 4 खंड ओलांडून सिंगापूरहून अंटार्क्टिकापर्यंतचा प्रवास केल्याचे सांगितले आहे. ही आतापर्यंतची जगातील सर्वात लांबीची फूड डिलिव्हरी असल्याचे सांगण्यात येत आहे. स्वतःच्या प्रोफाइलवर तिने शेअर केलेल्या व्हिडिओत मानसाने कशाप्रकारे हातात खाद्यपदार्थांचे पाकीट घेत 30 हजार किलोमीटरचे अंतर पूर्ण केले हे दिसून येते. या प्रवासाची सुरुवात सिंगापूरमधून झाली होती. मग जर्मनी आणि अर्जेंटीनामार्गे मानसा अंटार्क्टिका येथे पोहोचली आणि तेथे जाऊन तिने ग्राहकाला फूड डिलिव्हरी दिली आहे.
मानसाने या फूड डिलिव्हरीला एका मोहिमेंतर्गत पूर्ण केले आहे. याकरता ती मागील 2 वर्षांपासून प्रयत्न करत होती. अनेक ठिकाणांहून तिने निधी गोळा केला, परंतु या कामगिरीसाठी तिला मोठा पुरस्कर्त्याची गरज होती. फूड पांडासोबत मानसाची भागीदारी झाली आणि या कंपनीने मानसाच्या या ट्रिपचा खर्च उचलला आहे. या फूड डिलिव्हरीदरम्यान मानसाला अनेक हिमाच्छादित पर्वत, दलदलयुक्त मार्ग ओलांडावे लागले आहेत.