इजिप्तची प्राचीन पिरॅमिड्स हे सर्वांनाच भुरळ घालणारे गूढ आहे. आजवर या पिरॅमिडसचे संशोधन करण्यासाठी अनेकांनी आपली आयुष्ये व्यतीत केली आहेत. तथापि, दर काही वर्षांनी त्यांच्या काही नव्या रहस्यांचा शोध लागतो. या प्राचीन देशात हजारो वर्षांपूर्वी फरोहाच्या अनेक वंशानी राज्य केले. त्यांच्यापैकी पाचव्या राजघराण्यातील सहुरा नामक सम्राटाच्या सन्मानार्थ एक पिरॅमिड निर्माण करण्यात आला होता. या पिरॅमिडला त्याच्या नावानेच ओळखले जाते. या पिरॅमिडमध्ये नुकताच काही गूढ खोल्यांचा शोध लागला असून आणखी संशोधन सुरु आहे.
हे कक्ष किंवा खोल्या 4 हजार 400 वर्षांपूर्वीच्या आहेत. वूर्जबर्ग येथील ज्युलियस मॅक्झिमिलियन्स विद्यापीठाच्या संशोधक दलाने त्यांचा शोध काही काळापूर्वी लावला आहे. हे कक्ष त्याकाळात साठवणूक कक्ष म्हणून उपयोगात आणले जात असत, असे अनुमान आहे. सहुरा यांच्या कार्यकाळात इजिप्तमध्ये शांतता आणि मोठ्या प्रमाणात समृद्धी होती. या राजाने आपल्या शेजारी देशांशी युद्धे न करता व्यापार वृद्धींगत केला. त्यामुळे जनतेला तो प्रिय होता.
नव्याने शोधण्यात आलेल्या या कक्षांचे बरेच संशोधन अद्याप व्हावयाचे आहे. सध्या त्यांचा नकाशा बनविण्याचे काम सुरु आहे. या कक्षांची छपरे हजारो वर्षे स्वच्छ न केल्याने त्यांची मोठी झीज झाली आहे. त्यांची आता दुरुस्ती करण्याचे काम सुरु आहे. या कक्षांमध्ये नेमके काय आहे, हे त्यांची दुरुस्ती केल्यानंतरच समजून येणार आहे. मात्र, ही दुरुस्ती करताना त्यांच्या मूळ रचनेला धक्का लागू नये याची दक्षता घेण्यात येत आहे. तसेच खोदकाम करतानाही पिरॅमिडचे मूळ स्वरुप जसेच्या तसे रहावे, यासंदर्भातही संशोधक दक्ष आहेत.