अद्वितीय सागरी जैवविविधतेचाही शोध गौरवास्पद : सीएसआयआर – एनआयओचे महत्वपूर्ण संशोधन
पणजी : अतिशय वैशिष्ट्यापूर्ण अशा वैज्ञानिक प्रयोगात गोव्यातील सीएसआयआर – एनआयओने महत्वपूर्ण संशोधनाद्वारे निकोबार पाणबुडी ज्वालामुखीच्या गूढ आर्कावर प्रकाश टाकणारे उल्लेखनीय शोध लावले आहेत. अंदमान समुद्रातील या फारशा लक्ष न गेलेल्या प्रदेशाने अनेक वर्षांपासून शात्ज्ञांची उत्सुकता वाढवली आहे, विशेषत: 2004 मध्ये विनाशकारी त्सुनामीला उद्युक्त करणाऱ्या भूकंपानंतर आणि त्यानंतर गेल्या दोन दशकांमध्ये या भागात भूकंपाच्या प्रमाणात वाढ झाल्याने या भागाकडे शास्त्रज्ञांचे लक्ष वेधले गेले आहे.
पाण्याखाली ज्वालामुखींची उपस्थिती
नोव्हेंबर 2007 मध्ये, सीएसआयआर – एनआयओच्या शास्त्रज्ञांच्या चमूने भूकंपाचे धक्के जाणवणाऱ्या प्रदेशावर उच्च-रिझोल्यूशन मल्टीबीम इको-साउंडिंग (एमबीइएस) सर्वेक्षण सुरू केले. त्यांच्या अथक परिश्रमानंतर सु-विकसित दुहेरी पाणबुडीच्या ज्वालामुखींची अर्थात पाण्याखालील ज्वालामुखींची उपस्थिती उघडकीस आली, ज्यामुळे या क्षेत्राबद्दलची अधिक माहिती उलगडण्यात एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला.
भूकंपाच्या स्थानांचाही शोध
त्यानंतर, 2014 मध्ये, सीएसआयआर – एनआयओच्या शास्त्रज्ञांनी ज्वालामुखीच्या आर्कचे निरीक्षण करण्याच्या उद्देशाने चार महिन्यांचे ओशन बॉटम सिस्मोमीटर सर्वेक्षण केले. या कालावधीत, त्यांनी कमी-फ्रिक्वेंसी आणि वेगळ्या हायड्रो-अकॉस्टिक टप्प्यांद्वारे वैशिष्ट्यीकृत भूकंपाची अनेक स्थाने शोधली, जे उथळ मॅग्मा चेंबरशी संबंधित असलेल्या उप-पृष्ठभागाच्या टेक्टोनिक आणि मॅग्मॅटिक प्रभावांची उपस्थिती दर्शवतात.
दोन गॅस फ्लेअर्सची उपस्थिती
या संशोधनाच्या आधारे 2018 आणि 2021 मध्ये ‘आरव्ही सिंधू साधना’ जहाजावर दोन मोठ्या मोहिमा हाती घेण्यात आल्या. उच्च-रिझोल्यूशन मल्टीबीम इको-साउंडिंग सर्वेक्षण आणि वॉटर कॉलम इमेजिंग वापरून ज्वालामुखीच्या आर्कची तपासणी करणे आणि क्रेटरेड सीमाउंटवर आढळलेल्या गॅस फ्लेअर्सचे भौगोलिक महत्त्व शोधणे ही या मोहिमेची प्राथमिक उद्दिष्टे होती. 2018 च्या मोहिमेने निकोबार ज्वालामुखीच्या आर्क विषयी अधिक माहिती समजून घेण्यात मोठे साहाय्य झाले. ज्याद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने क्रेटरेड सीमाउंटच्या बाहेरील बाजूस दोन गॅस फ्लेअर्सची उपस्थिती आढळून आली.
सक्रिय ज्वालामुखी असल्याचे सिद्ध
पहिल्या, गॅस फ्लेअरचे उगमस्थान आग्नेय बाजूस, 710 मीटर खोलीवर होते आणि तो समुद्राच्या पृष्ठभागापासून अंदाजे 225 मीटर उंचीवर होता. त्याचप्रमाणे, वायव्य दिशेकडील दुसरी फ्लेअर, 400 मीटर खोलीपासून उगम पावते, आणि 150 ते 100 मीटर पर्यंतच्या उंचीवर जाते. या गॅस फ्लेअर्सने या प्रदेशात सक्रिय ज्वालामुखी असल्याचे सिद्ध झाले, ज्यामुळे त्याच्या भूभौतिकीय प्रक्रियांबद्दल पुढील तपासणी करण्यास दिशा मिळाली. 2021 च्या मोहिमेने निकोबार पाणबुडी ज्वालामुखीच्या आर्कमध्ये सुऊ असलेल्या ज्वालामुखीच्या क्रियांची पुष्टी केली आणि अनपेक्षित शोध लावले गेले. वायव्य बाजूस गॅस फ्लेअर पुन्हा तयार करणे आणि विसंगती शोधणे हे टीमचे उद्दिष्ट होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यांना दक्षिणेला एक नवीन गॅस फ्लेअर सापडला, जो 380 मीटर खोलीपासून उगम पावला आणि 150 मीटर उंचीवर पोहोचला. या शोधामुळे वेगवेगळ्या स्थानांवर वेगवेगळ्या वेंटिंग क्रिया सुऊ असल्याचे दिसून येते.
बाथिमोडियोलस प्रजाती सापडली
प्रत्यक्ष स्वरूपात खडकांच्या नमुन्यांमध्ये, बाथिमोडियोलस प्रजाती देखील सापडली. सूक्ष्मजंतूंची ही प्रजाती अद्वितीय सागरी अधिवास दर्शविणारी केमोसिंथेटिक प्रजाती असून विशेषत: मिथेन सीप्स आणि ज्वालामुखीच्या अभिक्रियांमधून प्रभावित हायड्रोथर्मल व्हेंट साइटशी संबंधित आहे. हे संशोधन प्रदेशातील भूभौतिकीय प्रक्रियांबद्दल आपल्याला अधिक माहिती प्रदान करते. या नाजूक सागरी परिसंस्थांचे संरक्षण करण्याची गरज अधोरेखित करते आणि पुढील शोध आणि अभ्यासाला प्रोत्साहन देते.