बेळगाव : अनुसूचित जाती-जमातीच्या एमबीबीएस आणि बीईमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना महापालिकेतर्फे लॅपटॉपचे वितरण करण्यात आले. महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, आमदार राजू सेठ यांच्या हस्ते लॅपटॉप देण्यात आले. महापालिका सभागृहामध्ये सोमवारी त्याचे वितरण करण्यात आले. उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारतर्फे लॅपटॉप दिले जातात. महापालिकेच्या माध्यमातून 24 विद्यार्थ्यांना लॅपटॉपचे वितरण करण्यात आले. महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होणार होता. मात्र, 1.30 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात झाली. यामुळे विद्यार्थ्यांना बराच काळ ताटकळत थांबावे लागले. यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी नगरसेवक राजशेखर डोणी, रवी धोत्रे, अजिम पटवेगार व इतर नगरसेवक उपस्थित होते.
महापौरांना पूर्वकल्पना दिली नसल्याने उशीर
विद्यार्थ्यांना लॅपटॉप वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्याबाबत महापौरांसह लोकप्रतिनिधींना केवळ एकच दिवस आधी नोटीस दिली. वास्तविक किमान चार दिवस आधी या कार्यक्रमाबाबत कल्पना देणे गरजेचे होते, असे सांगण्यात आले. मात्र, मनपा आयुक्तांनी माहिती दिली नाही, म्हणून महापौर यांच्यासह नगरसेवक उशिराने सभागृहात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना ताटकळत थांबावे लागले.