पुणे / प्रतिनिधी :
राज्याच्या सांस्कृतिक विभागाकडे अर्ज केल्यानंतर मराठी चित्रपटांना तीन महिन्यांत अनुदानाचे वितरण करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिकमंत्री सुधीर मनुगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी येथे केली. चित्रपट अनुदान समितीची लवकरच पुनर्रचना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
एका कार्यक्रमासाठी ते पुण्यात आले होते. कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यामध्ये सत्ताबदल झाल्यानंतर चित्रपट अनुदान समिती बरखास्त करण्यात आली असल्याने 204 मराठी चित्रपटांचे अनुदान रखडले आहे, याकडे लक्ष वेघले असता सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने समितीची पुनर्रचना केली जाणार असून, अर्ज आल्यापासून तीन महिन्यांत अनुदान दिलेच पाहिजे, असा नियम केला जाणार असल्याचे स्पष्ट केले.
अनुदानासाठी उत्तम पारदर्शक व्यवस्था केली जाणार आहे. यापूर्वी अनुदान देताना काही अन्याय झाला होता. त्याबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. यापूर्वी ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ अशा तीन श्रेणी होत्या. त्यानुसार परीक्षण झाल्यानंतर अनुदानाचे वितरण केले जात होते. मधल्या काळात केवळ दोनच श्रेणी होत्या. मात्र, चित्रपट निर्मात्यांच्या मागणीनुसार आता अनुदानासाठी ‘अ’, ‘ब’, ‘क’ अशा श्रेणी असतील. संकल्पनांवर आधारित आणि सामाजिक विषयाच्या चित्रपटांना विशेष अनुदान देण्यात येणार आहे. त्याबरोबरच राष्ट्रीय पुरस्कार मिळणाऱ्या मराठी चित्रपटाला दुप्पट अनुदान देण्याचाही निर्णय घेतला जाईल, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.