अपघातास कारणीभूत महिलेला अटक करा : बाणस्तारी अपघातप्रकरणी पोलिसांवर संशय
फोंडा : बाणस्तारी अपघातात मद्यधुंद मर्सिडीझ कारचालकाने तिघा निष्पापांचा बळी घेतल्याप्रनकरणी मद्यधुंद महिला कारगाडी चालवित होती, असा संशय दिवाडी येथील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. अपघातास कारणीभूत जबाबदार धरून ‘त्या’ महिलेला ताबडतोब अटक करा, असा पवित्रा घेत काल मंगळवारी रात्री दिवाडी येथील पाचशेहून अधिक ग्रामस्थानी म्हार्दोळ पोलीस स्थानकावर येऊन पोलीस उपअधीक्षक आशिष शिरोडकर व निरीक्षक मोहन गावडे यांना घेराव घातला. आज बुधवारी सकाळपर्यंत त्या महिलेला अटक करा, असा इशारा कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांच्यासह उपस्थितांनी यांनी दिला. यावेळी त्यांच्यासमवेत उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धेश श्रीपाद नाईक, काँग्रेसचे रामा काणकोणकर, संजय बर्डे, अॅड प्रतिमा कुतिन्हो, तारा केरकर व इतर ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. दिवाडीचे, बाणस्तारीचे व अन्य ठिकाणचे मिळून हजारभर नागरिक जमले होते.
प्रश्नांच्या भडीमारासमोर उपअधीक्षक हतबल
म्हार्दोळ पोलिसांनी तपासकामात अनेक त्रुटी ठेवल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. ओपा ते बाणस्तारी दरम्यान एकही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळू शकत नसल्याबद्दल आ़श्चर्य व्यक्त करुन पोलिसांनी मुद्दामहून तपासकामात हयगय केल्याचा आरोप रामा काणकोणकर यांनी केला. तपासकामासंबंधी संशयाला वाव देणाऱ्या त्रुटींबाबत उपअधीक्षक आशिष शिरोडकर यांना विचारण्यात आल्यानंतर जमावाला उत्तर देताना ते हतबल झाल्याचे दिसून आले.
हा मद्यधुंद दांपत्त्याने केलेला खून : फळदेसाई
पोलीस निरीक्षकांच्या कक्षात झालेल्या बैठकीत कोणताच तोडगा निघत नसल्याचे दिसून आल्यानंतर जमावासमोर बोलताना आमदार राजेश फळदेसाई यांनी या घटनेत तिघा निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे. हा अपघात नसून मद्यधुंद सावर्डेकर दांपत्यांने केलेला खूनच आहे, असा दावा केला. याप्रकरणी मुख्य संशयित ड्रायव्हर सीटवर बसलेली महिला असून, बुधवार सकाळपर्यंत तिला अटक करा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी जमाव आक्रमक बनला होता. आज बुधवारी सकाळपर्यंत त्या महिलेला अटक केली नाही, तर दुपारी पोलीस स्थानकासमोर मोठे आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
फडते कुटुंबियांना न्याय मिळवून देणार
आपल्या मतदारसंघातील फडते कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी मोठा वकील मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न राहतील. ती महिला एका सत्ताधारी आमदाराची नातेवाईक असली तरी बेहत्तर, गरीब कुटुंबियांवर अन्याय होऊ देणार नाही. वेळप्रसंगी विधानसभा अधिवेशनात याप्रश्नावर मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्याकडे चर्चा करणार, असे आश्वासन फळदेसाई यांनी दिले.
महिला ड्रायव्हर सीटवर असल्याची कबुली
पोलीस उपअधीक्षक आशिष शिरोडकर हे प्रकरण हाताळण्यास सपशेल अपयशी ठरले आहेत. प्रत्येकवेळी ते आपली भूमिका बदलत असून केवळ दिशाभूल करणारी वक्तव्ये करीत आहेत. एका दिवशी संशयित परेश सावर्डेकर हा मर्सिडीझ चालवित होता म्हणतात, तर दुसऱ्या दिवशी चालकाच्या सिटवर महिला बसलेली आढळल्याची कबुली देतात. त्यामुळे काल दिवाडी बेटावरील ग्रामस्थांसमोर ते उघडे पडले. नंतर तपासाचे काम पोलिसांचे, मात्र तुम्ही साक्षीदार व्हा, त्या महिलेवर गुन्हा नोंदवू अशी भाषा ते बोलू लागल्यानंतर मात्र जमाव अधिकच संतप्त झाला. सुमारे दीड तास चर्चा चालली. म्हार्दोळ पोलीस स्थानकावर हजारभर लोकांचा जमाव होता. रात्री उशिरा दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अभिषेक धनिया यांनी म्हार्दोळ पोलीस स्थानकास भेट देऊन पोलिसांशी चर्चा केली. त्याचबरोबर या तपासासाठी आवश्यक असलेली ओपा ते बाणस्तारीपर्यंतची सीसीटीव्ही फुटेज मिळविण्यात येईल, असेही ते म्हणाले.