भारताचा पाकिस्तानविरुद्ध 5 गडी राखून एकतर्फी विजय, भुवनेश्वरचे 4 बळी
दुबई / वृत्तसंस्था
भुवनेश्वर कुमारची अफलातून स्विंग गोलंदाजी आणि हार्दिक पंडय़ा-जडेजाच्या 52 धावांच्या तुफानी भागीदारीमुळे भारताने कट्टर, पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 5 गडी राखून धुव्वा उडवला आणि यंदाच्या आशिया चषक स्पर्धेत खणखणीत विजयी सलामी दिली. प्रारंभी, पाकिस्तानचा डाव 19.5 षटकात सर्वबाद 147 धावांवर गुंडाळल्यानंतर भारताने 19.4 षटकात 5 बाद 148 धावांसह दणकेबाज विजय मिळवला.
विजयासाठी 148 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघातर्फे विराट कोहली व जडेजा यांनी प्रत्येकी 35 धावांचे योगदान दिले तर हार्दिक पंडय़ाने अवघ्या 17 चेंडूत नाबाद 33 धावांची खेळी साकारत या विजयात सिंहाचा वाटा उचलला.
यापूर्वी गतवर्षी ऑक्टोबरमध्ये भारताला टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध 10 गडय़ांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. तो दुबईतील हिशेब भारताने या निकालासह दुबईतच चुकता केला!
प्रारंभी, केएल राहुल डावातील दुसऱयाच चेंडूवर बाद झाल्याने भारताला जबरदस्त धक्का बसला. रोहितने देखील उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात नवाझच्या गोलंदाजीवर लाँगऑफवरील इफ्तिकारकडे सोपा झेल दिला. पाकिस्तानविरुद्ध हमखास फलंदाजी बहरते, असा अनुभव असलेल्या विराटने 34 चेंडूत 3 चौकार, 1 षटकारासह 35 धावांचे योगदान दिले. विराट बाद झाल्यानंतर भारताने सूर्यकुमार यादवऐवजी रविंद्र जडेजाला बढती दिली आणि जडेजाने याचा लाभ घेत काही आक्रमक फटके लगावले.
डावातील 9 व्या षटकात मैदानात उतरल्यानंतर जडेजाने संयमी फलंदाजीवर भर दिला आणि खराब चेंडूंचा समाचार घेण्यातही कसर सोडली नाही. पाचव्या स्थानी उतरलेल्या सूर्यकुमार यादवला नसीमच्या गोलंदाजीवर त्रिफळा उडाल्यानंतर 18 धावांवर परतावे लागले. जडेजा मोक्याच्या क्षणी त्रिफळाचीत झाला असला तरी त्यापूर्वीच त्याने आपली जबाबदारी चोख पार पाडली होती. हार्दिक पंडय़ा व दिनेश कार्तिक यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले.
तत्पूर्वी, भुवनेश्वर कुमार (4-26), हार्दिक पंडय़ा (3-25), अर्शदीप सिंग (2-33) यांच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकिस्तानचा डाव 19.5 षटकात सर्वबाद 147 धावात संपुष्टात आला. पाकिस्तानतर्फे सलामीवीर मोहम्मद रिझवानने 42 चेंडूत 4 चौकार, 1 षटकारासह सर्वाधिक 43 धावांचे योगदान दिले.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकल्यानंतर अपेक्षेप्रमाणे क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. अलीकडील कालावधीत उत्तम सूर सापडलेल्या भुवनेश्वरच्या गोलंदाजीला सामोरे जाताना काहीसे झगडावे लागल्यानंतर बाबर आझम त्याचाच पहिला बळी ठरला. भुवनेश्वरच्या किंचीत उसळलेल्या चेंडूवर आझमचा उत्तुंग फटका लगावण्याचा प्रयत्न सपशेल फसला आणि शॉर्ट फाईन लेगवर तैनात अर्शदीपने लॉलीपॉप झेल टिपत त्याची खेळी संपुष्टात आणली.
फखर झमान देखील 10 धावांवरच बाद झाला. अवेश खानच्या गोलंदाजीवर लागोपाठ आक्रमक फटके लगावल्यानंतर त्याने यष्टीमागे दिनेश कार्तिककडे सोपा झेल दिला. पहिले 2 फलंदाज 42 धावात बाद झाल्यानंतर रिझवानने त्यानंतरही एक बाजू लावून धरत धावफलक सातत्याने हलता ठेवण्याचा प्रयत्न केला.
डावातील 13 व्या षटकात इफ्तिकारने चहलला लाँगऑनवरुन उत्तुंग षटकार खेचल्यानंतर पुढील फास्ट फुलटॉसवर परतीचा झेलही देऊ केला होता. पण, चहलला अगदी दुसऱया प्रयत्नातही त्यात यश आले नाही. मात्र, नंतर इफ्तिकार (22 चेंडूत 28) पंडय़ाच्या अपेक्षेपेक्षा अधिक उसळलेल्या चेंडूवर यष्टीमागे दिनेश कार्तिककडे झेल देत तंबूत परतला. दिनेश कार्तिकने हवेत झेपावत अप्रतिम झेल पूर्ण केला. अनुभवी रिझवान 42 चेंडूत 43 धावांवर बाद झाल्यानंतर त्याच षटकात खुशदिल देखील तंबूत परतला.
पुढे, शदाब (10), असिफ अली (9), नवाझ (1), नसीम शाह (0) ठरावीक अंतराने बाद झाल्याने पाकिस्तानची धावसरासरी खालावली. अंतिम टप्प्यात नवख्या दहानीने खेचलेले 2 षटकार मात्र सनसनाटी माजवणारे ठरले. तो 6 चेंडूत 16 धावांवर शेवटच्या गडय़ाच्या रुपाने बाद झाला. त्याचा अर्शदीपने त्रिफळा उडवला.
धावफलक
पाकिस्तान ः मोहम्मद रिझवान झे. अवेश, गो. पंडय़ा 43 (42 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), बाबर आझम झे. अर्शदीप, गो. भुवनेश्वर 10 (9 चेंडूत 2 चौकार), फखर झमान झे. दिनेश कार्तिक, गो. अवेश खान 10 (6 चेंडूत 2 चौकार), इफ्तिकार अहमद झे. दिनेश कार्तिक, गो. पंडय़ा 28 (22 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), खुशदिल झे. जडेजा, गो. पंडय़ा 2 (7 चेंडू), शदाब खान पायचीत भुवनेश्वर 10 (9 चेंडूत 1 चौकार), असिफ अली झे. यादव, गो. भुवनेश्वर 9 (7 चेंडू), मोहम्मद नवाझ झे. कार्तिक, गो. अर्शदीप 1 (3 चेंडू), हॅरिस रौफ नाबाद 13 (7 चेंडूत 2 चौकार), नसीम शाह पायचीत भुवनेश्वर 0 (1 चेंडू), शाहनवाझ दहानी त्रि. गो. अर्शदीप 16 (6 चेंडूत 2 षटकार). अवांतर 5. एकूण 19.5 षटकात सर्वबाद 147.
गडी बाद होण्याचा क्रम
1-15 (बाबर आझम, 2.4), 2-42 (फखर, 5.5), 3-87 (इफ्तिकार, 12.1), 4-96 (रिझवान, 14.1), 5-97 (खुशदिल, 14.3), 6-112 (असिफ, 16.3), 7-114 (नवाझ, 17.1), 8-128 (शदाब, 18.2), 9-128 (नसीम, 18.3), 10-147 (दहानी, 19.5).
गोलंदाजी
भुवनेश्वर कुमार 4-0-26-4, अर्शदीप सिंग 3.5-0-33-2, हार्दिक पंडय़ा 4-0-25-3, अवेश खान 2-0-19-1, यजुवेंद्र चहल 4-0-32-0, रविंद्र जडेजा 2-0-11-0.
भारत ः रोहित शर्मा झे. इफ्तिकार, गो. नवाझ 12 (18 चेंडूत 1 षटकार), केएल राहुल त्रि. गो. नसीम शाह 0 (1 चेंडू), विराट कोहली झे. इफ्तिकार, गो. नवाझ 35 (34 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), रविंद्र जडेजा त्रि. गो. नवाझ 35 (29 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), सूर्यकुमार यादव त्रि. गो. नसीम 18 (18 चेंडूत 1 चौकार), हार्दिक पंडय़ा नाबाद 33 (17 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), दिनेश कार्तिक नाबाद 1 (1 चेंडू). अवांतर 14. एकूण 19.4 षटकात 5 बाद 148.
गडी बाद होण्याचा क्रम
1-1 (केएल राहुल, 0.2), 2-50 (रोहित, 7.6), 3-53 (विराट, 9.1), 4-89 (सूर्यकुमार, 14.2), 5-141 (जडेजा, 19.1).
गोलंदाजी
नसीम शाह 4-0-27-2, शाहनवाझ दहानी 4-0-29-0, हॅरिस रौफ 4-0-35-0, शदाब खान 4-0-19-0, मोहम्मद नवाझ 3.4-0-33-3.
हार्दिक पंडय़ाचे एकाच षटकातील 3 चौकार आणि त्यानंतर विजयी षटकार!
शेवटच्या 2 षटकात 21 धावांची आवश्यकता असताना हार्दिक पंडय़ाने हॅरिस रौफच्या षटकात 3 चौकार फटकावले आणि त्यात एकूण 14 धावा वसूल झाल्या. त्यानंतर शेवटच्या षटकात 7 धावांची गरज असताना कार्तिकने एकेरी धाव घेतली आणि चौथ्या चेंडूवर पंडय़ानेच लाँगऑनच्या दिशेने उत्तुंग षटकार फटकावत संघाला संस्मरणीय विजय संपादन करुन दिला!
रिझवानला पंचांनी पहिल्याच षटकात बाद दिले होते, पण…
भुवनेश्वर कुमारच्या पहिल्या षटकातील दुसऱयाच चेंडूवर रिझवान चकला होता आणि भारताचे पायचीतचे जोरदार अपील पंचांनी उचलूनही धरले. पण, रिझवानने लगेच डीआरएस घेतला आणि त्यात चेंडू यष्टीच्या बऱयाच वरुन जात असल्याचे स्पष्ट झाल्याने तो बचावला. यानंतर लवकरच चौकार वसूल करत रिझवानने आपला फॉर्म अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. त्याने 15 व्या षटकात बाद होण्यापूर्वी 43 धावांचे योगदान दिले.
रिषभ पंतऐवजी दिनेश कार्तिकला पसंती, अश्विन देखील संघाबाहेर
भारताने या बहुचर्चित लढतीसाठी रिषभ पंतऐवजी आक्रमक फलंदाज-यष्टीरक्षक दिनेश कार्तिकला पसंती दिली. शिवाय, रविचंद्रन अश्विनला संघाबाहेर ठेवले. चहल-रविंद्र जडेजा असे दोन फिरकीपटू अंतिम एकादशमध्ये खेळवण्यात आले.
हार्दिक पंडय़ाच्या एकाच षटकात रिझवान-खुशदिल तंबूत!
आघाडीतील फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत असताना रिझवानने मात्र एक बाजू लावून धरत धावफलक हलता ठेवण्यावर भर दिला आणि एकदा सेट झाल्यानंतर आक्रमक पवित्र्याकडे कल असल्याचे अनेकदा दाखले दिले. मात्र, हार्दिक पंडय़ाने डावातील 15 व्या षटकात रिझवानसह खुशदिलला देखील बाद केले आणि यामुळे पाकिस्तानच्या धावसरासरीला ब्रेक बसला.
भुवनेश्वरचेही षटकात दुहेरी यश
हार्दिक पंडय़ाप्रमाणेच भुवनेश्वर कुमारने देखील एकाच षटकात 2 फलंदाज गारद करण्याचा पराक्रम गाजवला. डावातील 19 व्या षटकात भुवीने शदाब व नसीम यांना लागोपाठ चेंडूवर तंबूचा रस्ता दाखवला.