जवळपास प्रत्येक विश्वचषक स्पर्धेत काही तरी वेगळं घडत असतं. 1983 मध्ये भारताने आश्चर्यकारक लॉईडच्या विंडीजला हरवलं. 1992 मध्ये पाकिस्तान संघ कानामागे येऊन तिखट झाला. तर 1996 मध्ये श्रीलंका संघाने आक्रमकतेचा पाया रचत कप मिरवला. या विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी मॅक्सवेलचा मिडऑफला झेल सोडला नसता तर… अर्थात जर, तरला क्रिकेटमध्ये महत्त्व नाही हेही तेवढंच खरं. परंतु असं जर घडलं असतं तर कदाचित ऐन दिवाळीत अफगाणिस्तानच्या नावाने एक वेगळी रांगोळी आपल्याला बघायला मिळाली असती. जसे मोठमोठ्या गायन स्पर्धेच्या ऑडिशनमध्ये एखादा स्पर्धक छान गायल्यानंतरसुद्धा शेवटच्या क्षणी वरचा ‘सा’ लागत नाही. आणि परीक्षक त्याला सांगतात की अजून तुला रियाजाची गरज आहे. नेमकी तीच परिस्थिती या विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानची झाली.
असो. चला या विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीचे चार संघ ठरले. भारत विरुद्ध न्यूझीलंड. (पाकिस्ताने चमत्कार केला तर पाकिस्तान, अशी शक्यता फार धूसर आहे.) दुसरीकडे ऑस्ट्रेलियाविरुद्ध दक्षिण आफ्रिका. जरी या चार संघांनी चमकदार कामगिरी केली असली तरी खऱ्या अर्थाने 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तान भाव खाऊन गेला. गंमत बघा, विश्वचषक स्पर्धा सुरू होण्याअगोदर पात्रता फेरीत अफगाणिस्तानने विंडीजचा पराभव करीत स्वत:ला पात्र करून घेतलं. अर्थात त्यावेळी मला थोडं वाईट वाटलं. कारण विंडीजसारखा संघ (जरी पूर्वीसारखं त्यांच्या क्रिकेटमध्ये ‘राम’ नसला तरी) विश्वचषक स्पर्धेत नाही याची कधी आपल्याला सवय नव्हती. परंतु झालं ते क्रिकेटच्या भल्यासाठी झालं असंच म्हणावं लागेल. कारण अफगाणिस्तानसारख्या एका गुणवान संघाचा या स्पर्धेच्या अनुषंगाने उदय झाला.
बघा ना, या संघाने तीन माजी विश्वविजेत्यांना पराभूत केले. सुरुवात तर त्यांनी 2019 च्या विश्वविजेत्यापासूनच केली. प्रथम इंग्लंडला, नंतर त्यांचे शेजारी पाकिस्तानला कुठलीही दयामाया दाखवली नाही. तर 1996 च्या विश्वविजेत्या श्रीलंकेचा पराभव करत 2025 च्या चॅम्पियन ट्रॉफीपासून त्यांना दूर केलं. अक्षरश: या तिन्ही संघांना उचलून उचलून आपटलं. ज्या लिंबू टिंबू संघांपासून सावध रहा असे वारंवार क्रिकेट विश्लेषक टाहो फोडून ओरडत होते. विशेषत: अफगाणिस्तान तुम्हाला कधी रस्त्यावर आणेल हे सांगता येत नाही, हे वारंवार सांगितलं जात होतं. नेमकं तेच घडलं. पाकिस्तानला जी खोलवर जखम झाली आहे ती अफगाणिस्तानकडून झालेल्या पराभवामुळेच. शेवटी शेवटी तर ऑस्ट्रेलियाच्या तोंडाला त्यांनी फेस आणला होता. तो जर झेल सुटला नसता तर कदाचित ऑस्ट्रेलियाचा संघ तळ्यात मळ्यात राहिला असता.
गंमत बघा, या संघाने कुठल्याच प्रतिस्पर्धी संघाला नऊ सामन्यात 300 च्या वर टप्पा गाठू दिला नाही. आजच्या घडीतील सर्वात चांगले स्पिनर्स त्यांच्या भात्यात आहेत. या पूर्ण स्पर्धेत भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू अजय जडेजा यांनी मेंटॉरची भूमिका छान वठवली. त्याचप्रमाणे सिंधुदुर्गचे सुपूत्र दत्ता मिठबावकर यांनी लायझनिंग ऑफिसरची भूमिका समर्थपणे पेलली. अर्थात दत्ता मिठबावकर हे क्रिकेट जगताचे द्रोणाचार्य गुरुवर्य रमाकांत आचरेकर सरांचे शिष्य. सिंधुदुर्ग क्रिकेटच्या युवा भवितव्यासाठी देवगडात क्रिकेट अकॅडमीचा पाया घालणारे उदय रुमडे, विजय जोईल, सुधीर साटम यांचे सहकारी. अर्थात अजय जडेजा आणि दत्ता मिठबावकर या दोघांची कामगिरी अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाला दुर्लक्षित करून चालणार नाही, हे ही तेवढंच खरं. या दोन्ही दिग्गजांनी आपल्यात असलेल्या अविरत प्रतिभेच्या अनुभवाचे योगदान अफगाणिस्तान संघासाठी दानशूरतेने दिले हे निर्विवाद सत्य!
यापुढे कुठला संघ अफगाणिस्तानला कमी लेखणार नाही. किंबहुना मी तर असं म्हणेन की, यापुढे अफगाणिस्तानला हरवताना प्रत्येक संघाला वाघाची शिकार केल्याचा आनंद होईल. अफगाणिस्तानविरुद्ध खेळताना विश्वचषक स्पर्धेतील प्रथितयश संघाला दोन गुण खिशात घालताना त्यांची बरीच घालमेल होताना बघायला मिळेल. असो, असा हा गुणवान अफगाणिस्तान संघ उपांत्य फेरीत नाही याचं वाईट वाटणं साहजिकच आहे. कदाचित ते नियतीला मान्य नसावं. मला अफगाणिस्तानच्या एकूण कामगिरीनंतर देवानंदच्या ‘गाईड’ चित्रपटातील ते गीत आठवलं ‘गाता रहे मेरा दिल तुही (अगला विश्वचषक) मेरी मंजिल.’ शेवटी जाता जाता मी हेच म्हणेन ‘उठा उठा दिवाळी आली, उगवत्या अफगाणिस्तान संघाला निरोप देण्याची वेळ झाली!’