भाऊबिजेदिवशी मोठ्या प्रमाणात खरेदी
बेळगाव : दिवाळीची धामधूम संपली असून, बुधवारी भाऊबीज असल्याने सकाळपासूनच मटण, चिकन दुकानांसमोर नागरिकांची गर्दी झाली होती. दिवाळीच्या काळात मांसाहार वर्ज्य केला जात असल्याने दिवाळीची सांगता होताच मांसाहारी पदार्थांची खरेदी केली जाते. यामुळे मटण, मासे, चिकन खरेदीसाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. भाऊबिजेदिवशी दूरवरून आलेल्या बहिणीला चमचमीत जेवणाचा आस्वाद घेता यावा, यासाठी लाडक्या भावांनी मांसाहारी पदार्थांच्या खरेदीसाठी गर्दी केली होती. यामुळे मागील पाच-सहा दिवसांपासून थंडावलेला मांसविक्रीचा व्यवसाय बुधवारी मात्र तेजीत होता. दुकानांमध्ये गर्दी झाल्याने दुकानदारांना तारेवरची कसरत करत मटण, चिकनची विक्री करावी लागली. परंतु, दिवाळीनंतर दरामध्ये वाढ झाल्याने मांहासारी खवय्यांमधून नाराजीचा सूर उमटत होता.
मांसाहारी पदार्थांच्या मागणीत वाढ-उदय घोडके (मटणविक्रेता)
दिवाळीमुळे मागील काही दिवसांपासून मटण, चिकनची विक्री थंडावली होती. परंतु, दिवाळी संपताच भाऊबिजेदिवशी मांसाहारी पदार्थांना मागणी वाढली. त्यामुळे दरांमध्ये काही प्रमाणात वाढ झाली.