प्रकाशाचा उत्सव अर्थात दीपावलीचे आगमन दारापर्यंत आले आहे. खरीप हंगामाची समाप्ती आणि रब्बीची पेरणी करुन थंडीचा आनंद घेत लक्ष्मीची आराधना, आरोग्याची साधना आणि अंधारावर मात करुन नवनवे प्रकाश दिवे उजळण्याचे दिवस आहेत. म्हणूनच या उत्सवाला दीपोत्सव म्हणून ओळखले जाते. दसरा हा दिवाळीचा बिगुल आणि मग दिवाळी, देव दिवाळी, तुलसी विवाह वगैरे वगैरे सण उत्सव परंपरा. एकूणच आनंदाची पर्वणी आणि वाटचालीचा मागोवा घेण्याचा काळ. दिवाळीत दिवे असतात, प्रकाश असतो, फराळ असतो, कृतज्ञता असते. रंग, गंध, ध्वनी यांचे सारे सारे आनंद असतात आणि सर्व बाजूंनी प्रकाशाची पूजा होत असते. या प्रकाशात जगण्याच्या, पुढे जाण्याच्या, मानवतेच्या, संपन्नतेच्या, कृतज्ञतेच्या, संस्काराच्या वाटा प्रकाशित होतात आणि त्यावरुन वाटचाल करायची असते. गेली दोन वर्षे कोरोना काळात सारी मानवजात अडचणीत होती. पण आता जग त्यातून बाहेर येत आहे. निदान भारतीय तरी कोरोना संकटातून बाहेर पडले. पण हा दोन वर्षाचा फटका आणि त्या काळात झालेले बदल तंत्रज्ञानात झालेली प्रगती यामुळे जगण्याची दिशाच बदलली आहे. पूर्वांपार वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज, असे दिवाळीचे उत्सव. कृषी परंपरा, नाती आणि निसर्ग यांचे भान ठेऊन साजरे केले जात असत आणि तोच खरा आनंदाचा, प्रकाशाचा उत्सव आहे. अलिकडे सण हे इव्हेंटसारखे साजरे होऊ लागल्याने त्यातील विज्ञान व मर्म बाजूला पडून भपका वाढू लागला आहे. जे गणेशोत्सवाचे झाले आहे. दहीहंडीचे होते आहे तेच दिवाळीचे झाले आहे आणि दिवाळीच्या काळात दिव्याचा झगमगाट होत असला तरी दिव्याचा प्रकाश पडताना दिसत नाही. त्यासाठी अंतरीचा दिवाही प्रज्वलित करावा लागेल. दिवाळीच्या दिव्याचा तोच अर्थ आहे. गेली काही वर्षे दिवाळी आणि शेतकरी संघटनांचे उस आंदोलन हे समीकरण पक्के झाले आहे. शासनाने यंदा रब्बीच्या आधारभूत किंमतीत किंचित वाढीची घोषणा केली आहे. त्याचबरोबर नियमित कर्जफेड करणाऱया शेतकऱयांना पन्नास हजारपर्यंत अनुदान घोषीत केले आहे. पण शेतकऱयांच्या बाबतीत आभाळ फाटले आहे. ऐन दिवाळीत त्यांच्या डोळय़ात अश्रु आहेत आणि समोर अंधार दाटला आहे. हातातोंडाशी आलेले खरिपाचे पिक पाण्यात वाया गेले आहे. परतीचा पाऊस रोज तडाखे देतो आहे. सोयाबीन गेले, मूग, उडीद, ज्वारी गेली, द्राक्ष व फळबागांना फटका बसला. रोज विजांचा कडकडाट आणि ढगफुटी, पिके पाण्यात आणि शेतकरी अडचणीत हे दृष्टचक्र सुरु आहे. निसर्ग बदलतो आहे. तापमान वाढते आहे. समुद्रातील वादळे आणि पावसाळा यांना वेळापत्रक उरलेले नाही. पिकांवरील रोगराई वाढली आहे. शेतकऱयाला विक्रीतून जे पैसे मिळतात त्यात मजुरी, खत-औषध, दलाली, हमाली, वाहतूक, व्याज याचा मोठा फटका बसत आहे. उत्पन्न सुद्धा घटले आहे. काही वर्षापूर्वी फुले प्रगती,भूईमूग वेलाला पन्नास-साठ शेंगा लागत आता दहा-पंधरा म्हणजे खूप झाले. सोयाबिन असो, उस असो इतक्या फवारण्या आणि खते की शेती कुणासाठी हा प्रश्न उभा आहे. कर्जातून कर्जात, नुकसानीतून नुकसानीत अशी स्थिती आहे. शेतकरी संघटनेची नुकतीच जयसिंगपूरमध्ये ऊस परिषद झाली. कारखान्यांनी बॉयलर पेटवले आहेत. पण शिवारात पावसाचे पाणी साचल्याने उस तोडणीला अडचणी आहेत. त्यामुळे गाळप हंगाम सुरु होण्यास विलंब होत आहे. दिवाळीच्या दरम्यान उस वाहतुकीच्या गाडय़ांची टायरे जाळणे, हवा सोडणे, एसटी बंद पाडणे हे सुरु होते. दरवर्षीची तीच कहाणी आहे. पण शेतकरी फायद्यात येईल असे धोरण होत नाही. संबंधित सारे मालामाल होत आहेत पण शेतकरी रोज रडतो आहे. साखर उद्योगात काटामारी नवी नाही. अनेक नेते व त्यांचे कारखाने वर्षानुवर्षे शेतकऱयांचा काटय़ात काटा काढतात आणि स्वतःला शेतकऱयांचे तारणहार म्हणवून घेतात. आता अलिकडे उस तोडणीसाठी टोळय़ांना जेवण, बाटली व पाकीट द्यावे लागते. त्याचबरोबर उतारा चोरी ही नवी गुन्हेगारी सुरु झाली आहे. साखर कारखाने कमी कामगारात, खर्चात चालवले पाहिजेत आणि उसाचे एकरी उत्पादन वाढवले पाहिजे. काटा व सर्वच व्यवहारात पारदर्शकता हवी पण त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष आहे. साखर कारखाने आजारी पडून आपल्या पुटुंबीयांच्या घशात घालण्याचा साखर सम्राटांचा उद्योग सुरु आहे. दुध, धान्य, साखर वगैरे ग्राहकांना महाग मिळते. पण दलाल व चोर त्यामध्ये हात मारतात हे लक्षात घेतले पाहिजे. शेतकऱयांनी नेत्यांची, सहकाराची बदललेली नियत त्याच जोडीला बदललेला निसर्ग यांचा आढावा घेऊन यांत्रिक शेती, फायद्याची शेती यावर लक्ष केंद्रीत केली पाहिजे. चांगली बाजारपेठ हुडकली पाहिजे. अर्थकारण जपणारे दिवाळीचे दिवे शोधले पाहिजेत आणि प्रज्वलित करुन वाटचाल केली पाहिजे. शेतीबरोबर शिक्षण, आरोग्य, अर्थकारण, गुंतवणूक यासर्व क्षेत्रात कालानुरुप बदल केले पाहिजेत. महागाई जर आठ टक्क्यांनी वाढत असेल तर सहा टक्क्यांनी बँकात ठेवी ठेवणे मुर्खपणाचे आहे. व्यापार-उद्योग यांच्या नव्या दिशा ओळखून गुंतवणूक केली पाहिजे. बदलता निसर्ग, रोगराई, अनारोग्य यावरही स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. भपका आणि वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेऊन देशहित, लोकहित, मानवतेचे हित यावर कृती केली पाहिजे. भारत ही मधुमेहाची राजधानी बनली आहे हे वास्तव दिसते आहे. गरीब अधिक गरीब होत आहे. आठवे वेतन घेणारे कर्मचारी आणि कष्टकरी, कामगार, फिरते विक्रेते यांच्या उत्पन्नातील विषमता म्हणजे अणुबॉम्ब आहे. लोकांना उपाशी, कंगाल, दुखी ठेऊन कुणाला काचेच्या घरात राहता येणार नाही. घोषणा आणि शिंगाला बांधलेला हिरवा चारा भुकेला शमवणारा नाही. या सर्वांचा आढावा आणि नव्या दिशा, नवे संकल्प घेत आपल्या परिसरातील माणसांच्या सुखदुःखाचा विचार करुन गती-प्रगतीचे दिवे प्रज्वलित करण्याचा हा काळ आहे. लाडू, चिवडा द्या, अभ्यंगस्नान करा, रोषणाई करा पण दिवाळीचा अंतरीचा, गतीचा, प्रगतीचा, मानवतेचा एक तरी दिवा जागवा. आपल्याकडील प्रकाशाची, ज्ञानाची, प्रगतीची एक पणती गरजूंच्या दारातही लावा. सोबत पर्यावरण रक्षणही स्वतःपासून सुरु करा. तीच खरी दिवाळी. तेच लक्ष्मी पूजन, धन्वंतरी पूजन आणि दिवाळीचा दिवा.
Previous Articleविंडीजच्या विजयात जोसेफचे 4 बळी
Next Article वरदक्षिणेच्या स्वरुपात देतात 21 साप
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.
Related Posts
Add A Comment