साडेतीन मुहूर्तावर खरेदीसाठी सोन्या-चांदीचे दागिने, टीव्ही, मोबाईल, वाहनांसाठी मोठ्या प्रमाणात बुकिंग
बेळगाव : दिवाळी सणासाठी बाजारात नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. किराणा बाजार, इलेक्ट्रीक वस्तू, कपड्यांची दुकाने, मिठाई, गृहोपयोगी वस्तुंची दुकाने आदी ठिकाणी वर्दळ वाढली आहे. याबरोबरच बाजारात फळा-फुलांची आवकदेखील वाढली आहे. गुरुवारी वसुबारसपासून दिवाळी सणाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे विविध वस्तू खरेदीला वेग आला आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक समजल्या जाणाऱ्या दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सोन्या-चांदीच्या वस्तू, इलेक्ट्रीक वस्तू आणि वाहनांसाठी बुकिंग केले जात आहे. विशेषत: आकाशकंदील, दिवे, पणती आणि पूजेच्या साहित्याची खरेदीही केली जात आहे. दिवाळीत लखलखणाऱ्या दिव्यांना विशेष महत्त्व आहे. त्यामुळे मातीच्या व इतर दिव्यांची खरेदी सुरू आहे.
साधारण 20 रुपयांपासून 100 रुपये डझन याप्रमाणे दिव्यांची विक्री होऊ लागली आहे. विविध आकारातील आकर्षक आकाशकंदीलांची विक्री वाढली आहे. शहरातील गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, मेणसे गल्ली, किर्लोस्कर रोड, काकतीवेस रोड, मारुती गल्ली, खडेबाजार, समादेवी गल्ली, रामदेव गल्ली, नरगुंदकर भावे चौक आदी ठिकाणी नागरिकांची वर्दळ वाढू लागली आहे. कपडे, टीव्ही, फ्रिज, मोबाईल, घड्याळ आदी वस्तुंना पसंती मिळू लागली आहे. बाजारात पूजेच्या साहित्यालाही मागणी वाढू लागली आहे. रांगोळी, कापूस, वाती, अत्तर, उटणे, देवीचा मुखवटा, तोरण, शुभलाभ, लक्ष्मीची पावले आदी साहित्यांनी दुकाने सजली आहेत. त्यामुळे गणपत गल्ली, पांगुळ गल्ली आणि नरगुंदकर भावे चौकात खरेदीला उधाण येवू लागले आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत दुकाने उघडी ठेवली जात आहेत. त्याचबरोबर आबालवृद्धांसह सारेकुटुंब दिवाळीच्या खरेदीत मग्न असल्याचेही दिसत आहे.
फळांची आवक
दिवाळीच्या सणासाठी बाजारात विविध फळांची आवक वाढली आहे. फळांच्या दरात वाढ झाली आहे. सफरचंद 120 ते 200 रुपये किलो, सीताफळ 120 ते 200 रुपये, पेरु 100 ते 140 रुपये किलो, केळी 60 ते 100 रुपये डझन, चिकू 100 ते 140, डाळींब 180 ते 280 रुपये किलो, संत्री 80 ते 120 रुपये किलो, मोसंबी 80 ते 100 रुपये किलो असा फळांचा दर आहे. शुक्रवारी धनत्रयोदशी, रविवारी लक्ष्मीपूजन, मंगळवारी पाडवा व बुधवारी भाऊबीज होणार आहे. लक्ष्मीपूजनानिमित्त व्यावसायिक पूजन करतात. त्यामुळे बाजारात पूजेचे साहित्य, केळी, आंबोती आणि इतर साहित्याची लगबग पहावयास मिळत आहे.
झेंडूची आवक
बाजारात दिवाळीसाठी झेंडूची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. विशेषत: दिवाळीच्या सणासाठी झेंडूची खरेदी अधिक प्रमाणात होते. त्यामुळे होलसेल बाजारात झेंडू दाखल होऊ लागला आहे. शनिवारी आणि रविवारी झेंडू फुलांची मोठ्या प्रमाणात खरेदी होणार आहे.