शेतकरी बांधवांच्या घरांमध्ये होणार वासरु असलेल्या गायीचे पूजन, सायंकाळी पावणे सातनंतर करता येईल विधी
प्रतिनिधी/कोल्हापूर
आज वसूबारस…
दीपावलीचा पहिला दिवस…
चला गाय-वासराचे पूजन करुया…
धनदौलतीची प्रार्थना करुन आशिर्वाद घेऊया…अशी प्रार्थना करत शुक्रवार 21 रोजी वसुबारस हा सण साजरा केला जाणार आहे. या वसूबारसनेच प्रकाश, चैतन्य आणि मांगल्य घेऊन येणाऱया दीपावलीला सुरुवातही केली जाणार आहे. यानिमित्ताने शेतकरी बांधवांसह दुधाचा व्यवसाय करणाऱया सर्व कुटुंबीयांकडून गाय-वासराचे पूजन करुन त्यांना नैवेद्य अर्पण केला जाईल. सायंकाळी 6.45 ते रात्री 8.15 यावेळेतच गाय-वासराचे सर्वांना पुजन करता येईल.
गेल्या कित्येक वर्षाच्या परंपरेनुसार वसूबारस हा सण दीपावलीच्या दोन अथवा तीन दिवस आधी येतो. म्हणून या सणाला दीपावलीशी जोडले गेले आहे. गोवत्स द्वादशीचा दिवस म्हणूनही वसूबारसकडे पाहिले जाते. समुद्र मंथनातून नंदा नावाची कामधेनू गाय निघाली. त्यामुळेच वसूबारस दिवशी वासरु असलेल्या गायींचे पूजन करण्याची परंपरा आहे. या परंपरेनुसाररच शेतकरी बांधव शेती, काळीमाती, पाणी आणि वासरु असलेल्या गायीशी पूर्वीपासून असलेले नाते अधिक घट्ट करत शुक्रवारी वसूबारस हा सण साजरा करणार आहेत. सकाळी घरोघरी लक्ष्मीचे आगमन व्हावे अशी प्रार्थना करत नंदा धेनुचे स्मरण केले जाईल. याचवेळी उपवासही धरला जाईल. यानंतर गाय आणि वासरांना स्नान घालून सजवले जाईल. ठराविक वेळ पकडून त्यांचे पूजन करतानाच घरोघरी धनदौलतीची बरसात होऊ दे अशी प्रार्थना केली जाईल. तुमचे-आमचे नाते अधिक समृद्ध होऊ द्या अशा शब्दात गाय-वासरासमोर कृतज्ञताही व्यक्त केली जाईल.
हे ही वाचा : मोठी बातमी: ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांचा राजीनामा
दरम्यान, वसूबारसच्या पुर्वसंध्येला शेतकरी बांधव खरेदीसाठी बाजारपेठेत आले होते. त्यांनी दीपावलीच्या स्वागतासाठी लागणाऱया इत्यंभूत साहित्यासह गाय-वासरांना नटवण्यासाठी लागणारे सोनेरी-चंदेरी रंगातील वेसन, घुंगरु, भगव्या रिबनसह कवडय़ांच्या माळांची मोठय़ा प्रमाणात खरेदी केली. तसेच घर व गोठय़ाच्या दर्शनीला लावण्यासाठी लाईटच्या माळा, तोरण, पणत्या व आकाशदिव्यांची ही मोठय़ा प्रमाणात खरेदी केली.
धनत्रयोदशी शनिवारी
दीपावलीच्या पूर्वसंध्येला धनत्रयोदशी साजरी करण्याची परंपरा आहे. यंदा मात्र असे असणार नाही. शनिवार 22 रोजी तिथीची वृद्धी होणार असल्याने गुरुद्वादशी व धनत्रयोदशी एकत्र आली आहे. त्यामुळे शनिवारीच धनत्रयोदशी साजरी करावी लागणार आहे, याची करवीरवासियांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पंचांगकर्त्यांनी केले आहे. या आवाहनानुसार प्रथापरंपरेनुसार यमदीप दान करण्याबरोबरच कणकेचा दिवाही दक्षिणेकडे तोंड करुन ठेवण्याची तयारी करावी लागणार आहे. दवाखाने व औषधांच्या दुकानांनी धन्वंतरी देवतेचे पूजन शनिवारीच करावे, असेही पंचांगकर्त्यांचे सांगणे आहे.
सोमवार (दि. 24) : दीपावली, नरक चतुर्दशी, लक्ष्मी-कुबेर पूजन
बुधवार (दि. 25) : बलिप्रतिपदा, दीपावली पाडवा व भाऊबीज
पाच नोव्हेंबर : तुलसी विवाह