ध्वनीप्रदूषण केल्यास थेट कारावासाची शिक्षा
पणजी : राज्यात संगीत रजनींचे बेसुमार वाढलेले प्रस्थ आणि त्यातून अमर्याद आवाजात वाजविण्यात येणारे डीजे यांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत आता सरकाने कठोर कारवाईचा इशारा दिला असून थेट कारावासाची सुद्धा शिक्षा होऊ शकते, असा इशारा दिला आहे. पर्यटनाच्या नावाखाली गोव्यात काहीही आणि सर्वकाही चालते, असा समज करून घेत मौजमजा करण्यासाठी लोंढेच्या लोंढे येणाऱ्या पर्यटकांच्या मनोरंजनासाठी तयार असलेले हॉटेल आणि अन्य व्यावसायिक रात्ररात्रभर पार्ट्या आणि संगीत रजन्यांचे आयोजन करतात. किनारी भागात हे चित्र जास्त प्रमाणात दिसून येते. त्या दरम्यान संगीत रजनींचे आयोजक सर्व ताळतंत्र सोडून मोठमोठ्याने डीजे वाजवतात. आपण केवळ हॉटेलपूरतीच जागा नव्हे तर संपूर्ण गावच विकत घेतल्याच्या थाटात ते वावरत असतात. आपल्या शेजारी अन्य लोक राहतात, त्यात वयोवृद्ध, लहान मुले, विद्यार्थी असतात याचे सुद्धा भान ठेवले जात नाही. परिणामी ’पाप कुणाचे अन भोग कुणा’ अशी स्थिती स्थानिकांची होत असते.
काही ठिकाणी तर या रजन्या थेट पहाटेपर्यंत चालत असतात. मौजमजा करणारे त्या रात्रीपुरतेच आलेले असतात. त्यांना तो गाव आणि तेथील स्थानिकांचे हितसंबंध यांच्याशी काहीच देणेघेणे नसता. स्थानिक ग्रामस्थांना मात्र या रजनींच्या नावाखाली निरंतर रात्रीच्या रात्री जागवाव्या लागतात. अशा प्रकारांविरोधात स्थानिकांबरोबरच अनेक समाज कार्यकर्ते, त्यांच्या संस्था यांच्या माध्यमातून आवाज उठविण्यात येतो. परंतु पोलीस किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळ वा अन्य कोणत्याही संबंधित सरकारी यंत्रणेकडून लक्ष घालण्यात येत नाही. संगीत रजनी आयोजकांनी त्यांनाही खिशात घातले आहे की काय? असा संशय येईपर्यंत त्यांनी या प्रकारांविरोधात चुप्पी साधलेली असते. एवढेच नव्हे तर न्यायालयाने आदेश देऊनसुद्धा संगीत रजनी आयोजकांना हटकण्याचे वा हटविण्याचे धाडस कोणताही अधिकारी दाखवत नाही.
खरे तर संगीत वाजविण्यासाठी खाजगी असो वा व्यावसायिक आस्थापने असो, प्रत्येकाला योग्य कागदपत्रे सादर करून आगाऊ परवानगी घेण्याची सक्ती आहे. वेगवेगळ्या ध्वनीप्रदूषण उल्लंघनासाठी वेगवेगळ्या दंडाची तरतूद आहे. त्यात निवासी, व्यावसायिक, औद्योगिक क्षेत्र, आदींचा समावेश असतो. तसेच दंडाची रक्कम किमान 1 लाख व त्यापुढे असू शकते. उल्लंघन होत असल्याचे आढळल्यास योग्य कारवाई करण्यात येते. परंतु हे सर्व कायदे नियम कागदोपत्रीच राहतात. प्रत्यक्षात कुणावरही कारवाई होत नाही. परिणामी आपणावर कारवाई करण्याचे धाडस कुणाच्याही अंगी नसल्याचा फायदा घेत शेफारलेले आयोजक आवाजाच्या सर्व मर्यादा उल्लंघून निष्पाप लोकांना त्रास देत असतात. यापुढे मात्र हे प्रकार नियंत्रणात येतील वा थांबतील अशी अपेक्षा आहे. कारण त्याविरोधात आता सरकारी यंत्रणा जागृत झाल्या असून दंड आकारणी सोबतच उपकरणे सील करणे तसेच ध्वनीप्रदूषणास जबाबदार असलेल्यास कारावासाची शिक्षा सुद्धा होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. श्रावण महिना म्हणजे राज्यात सणावारांची रेलचेल असते. जन्माष्टमी, चतुर्थी, त्यानंतर दिवाळी, दसऱ्यातील गरबा, नाताळ, नवीन वर्ष असे कित्येक सण आणि त्यांना अनुषंगून संगीत कार्यक्रम साजरे होत असतात. त्यावेळी मोठ्या आवाजात डीजे वाजविण्याचे जसे काही फॅडच आलेले आहे. याचा नाहक त्रास निष्पाप लोकांना सहन करावा लागतो. अशा आयोजकांवर आता कठोर कारवाई होणार आहे.