वृत्तसंस्था/ दुबई
दुबईमधील पदार्पणात फेलिक्स ऑगर ऍलियासिमेने विजय नोंदवत दुबई टेनिस चॅम्पियनशिपच्या दुसऱया फेरीत स्थान मिळविले. त्याने अमेरिकेच्या मॅक्झिम पेसीवर विजय मिळविला. अन्य एक सामन्यात ऑस्ट्रेलियन ओपननंतर प्रथमच खेळणाऱया नोव्हॅक जोकोविचनेही विजयी सलामी दिली.
जोकोविचने जागतिक क्रमवारीत 130 व्या क्रमांकावर असणाऱया झेकच्या पात्रता फेरीतून आलेल्या टॉमस मॅकहॅकचा 6-3, 3-6, 7-6 (7-1) असा पराभव केला. तिसऱया मानांकित रशियाच्या डॅनिल मेदवेदेव्हने इटलीच्या मॅटेव अरमाल्डीवर 6-4, 6-2 अशी सहज मात केली. 2019 नंतर मेदवेदेव्ह प्रथमच येथील स्पर्धेत खेळत आहे. त्याची पुढील लढत कझाकच्या अलेक्झांडर बुबलिकशी होईल. चौथ्या मानांकित फेलिक्स ऑगर ऍलियासिमेने क्रेसीचा 7-6 (7-4), 3-6, 6-3 असा पराभव केला. त्याची पुढील लढत इटलीच्या लॉरेन्झो सोनेगोशी होईल. अन्य एका सामन्यात हॉलंडच्या बोटिक व्हान डी झांडस्कल्पने सहाव्या मानांकित कॅरेन खचानोव्हला 7-5, 6-2 असा पराभवाचा धक्का दिला तर ऑस्ट्रेलियाच्या ख्रिस्तोफर ओकॉनेलने फिनलंडच्या एमिल रुसुव्होरीवर 7-5, 6-4 अशी मात करीत आगेकूच केली. डॅनियल इव्हान्सने दुखापतीमुळे माघार घेतल्याने आठव्या मानांकित बोर्ना कॉरिकला पुढे चाल मिळाली.