फ्रेंच ओपन : स्पेनच्या कार्लोस अल्कारेझवर चार सेटमध्ये विजय : अंतिम लढतीत नॉर्वेच्या कॅस्पर रुडचे आव्हान
वृत्तसंस्था/ पॅरिस
सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविचने पायाच्या दुखापतीने त्रस्त झालेल्या स्पेनच्या कार्लोस अल्कारेझवर 6-3, 5-7, 6-1, 6-1 असा पराभव करून सातव्यांदा फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. वयाच्या 36 व्या वर्षी या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा जोकोविच 1925 पासून केवळ दुसराच टेनिसपटू ठरला. विशेष म्हणजे, जोकोविचचा हा कोणत्याही ग्रँडस्लॅमचा 34वा अंतिम सामना असणार आहे.
कार्लोसच्या पायात क्रँप, सामनाही गमावला
सुरुवातीपासून जोकोविचने आक्रमक खेळताना आपण दमदार फॉर्ममध्ये असल्याचे दाखवून दिले. कार्लोसने सामन्याचा पहिला सेट 3-6 ने गमावला होता. मात्र, दुसऱ्या सेटमध्ये त्याने शानदार टक्कर देत पुनरागमन केले आणि जोकोविचला 7-5 ने पराभूत केले. मात्र, यानंतर तिसऱ्या सेटमध्ये कार्लोसच्या डाव्या पायाला क्रँप आला होता. त्यामुळे तो लय गमावून बसला आणि पुनरागमन करु शकला नाही. कार्लोसने क्रँपमुळे तिसरा आणि चौथा सेट 6-1, 6-1 असा गमावला. दोघांमध्ये हा सामना एकूण 3 तास 23 मिनिटे चालला होता.
विशेष म्हणजे, कारकिर्दीत जोकोविच आणि सध्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला स्पेनचा अल्कारेझ दुसऱ्यांदा तर ग्रँडस्लॅम स्पर्धेत प्रथमच समोरासमोर आले होते. जोकोविचला आता ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेचे 23 वे ऐतिहासिक विजेतेपद निश्चितपणे खुणावत असेल. आतापर्यंत त्याने 22 ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवली आहे.
जागतिक विक्रम रचण्यापासून जोकोविच एक पाऊल दूर
टेनिसच्या दुनियेतील स्पॅनिश स्टार राफेल नदाल आणि जोकोविच यांनी सर्वाधिक प्रत्येकी 22 वेळा ग्रँडस्लॅम किताब जिंकला आहे. त्यामुळे जर जोकोविचने हा फ्रेंच ओपन किताब जिंकला, तर तो सर्वाधिक 23 ग्रँड स्लॅम जिंकून इतिहास रचेल आणि नदालला मागे टाकेल. याशिवाय, जोकोविचला आता फक्त एक अंतिम सामना जिंकायचा आहे. याससह तो जागतिक टेनिस क्रमवारीत नंबर एकचा टेनिसपटू बनेल.
जोकोविचने जिंकला 91 वा फ्रेंच ओपन सामना
फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश करत सर्बियाच्या या दिग्गज खेळाडूने अनेक विक्रम आधीच आपल्या नावावर केले आहेत. पहिला विक्रम म्हणजे, त्याने फ्रेंच ओपन स्पर्धेचा 91 वा सामना जिंकला. तो अशी कामगिरी करणारा पाचवा खेळाडू बनला आहे. तसेच, जोकोविच टेनिसच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेचा एकूण 34 व्यांदा अंतिम सामना खेळणार आहे. अंतिम सामन्यात जोकोविचचा सामना नॉर्वेच्या कॅस्पर रुडशी होणार आहे.
अंतिम फेरीत जोकोविच-रुड आमनेसामने
दरम्यान, फ्रेंच ओपनमधील दुसऱ्या उपांत्य सामन्यात नॉर्वेच्या रुडने जर्मनीच्या अॅलेक्झांडर व्हेरेव्हचा 6-3, 6-4, 6-0 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. विशेष म्हणजे, नॉर्वेच्या या युवा टेनिसपटूने सलग दुसऱ्यांदा प्रेंच ओपनची अंतिम फेरी गाठली आहे. मागील वर्षी अंतिम फेरीत त्याला स्पेनच्या नदालकडून पराभव स्वीकाराला लागला होता. यंदा मात्र त्याच्या कामगिरीकडे चाहत्यांचे लक्ष असणार आहे.
प्रतिक्रिया
खेळताना तंदुरुस्ती राखणे सर्वात महत्त्वाचे असते. ग्रँडस्लॅमसारख्या स्पर्धेत अखेरच्या टप्प्यात खेळताना पायात पेटके येणे खरेच दुर्दैवी आहे. मला आशा आहे तो लवकर बरा होईल. महत्त्वाच्या स्पर्धेत निर्णायक क्षणातून माघार घेण्याचा निर्णय घेणे खूप कठीण असते. अशा वेळी अल्कारेझने दाखवलेली लढण्याची जिद्द कमाल होती.
नोव्हॅक जोकोविच, सर्बियन टेनिसपटू
प्रतिक्रिया
जर्मनीच्या अॅलेक्झांडरविरुद्ध मिळालेले हे सर्वोच्च यश आहे. याशिवाय, सलग दुसऱ्यांदा फ्रेंच ओपनची अंतिम फेरी गाठल्याचा आनंद आहे. आता, जेतेपद मिळवणे हेच लक्ष्य असेल.
कॅस्पर रुड, नॉर्वेचा टेनिसपटू