वृत्तसंस्था/ पॅरीस
पॅरीस मास्टर्स पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत सर्बियाचा माजी टॉप सिडेड नोव्हॅक जोकोव्हिचने ग्रीकच्या सिटसिपेसचा उपांत्य फेरीत पराभव करत एकेरीची अंतिम फेरी गाठली. आता जोकोव्हिच आणि होलगेर रुने यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.
उपांत्य फेरीच्या सामन्यात जोकोव्हिचने सिटसिपेसचा 6-2, 3-6, 7-6 (7-4) अशा सेटस्मध्ये पराभव केला. हा सामना जिंकण्यासाठी जोकोव्हिचला टेनिस कोर्टवर तब्बल दोन तास झगडावे लागले. अलीकडच्या कालावधीत जोकोव्हिचने सलग 13 एकेरी सामने जिंकले आहेत. आता तो पॅरीसमध्ये आपले सातवे जेतेपद मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे. दुसऱया उपांत्य सामन्यात होलगेर रुनेने कॅनडाच्या ऑगेर ऍलीसिमेचा 6-4, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. रुनेने आपल्या अल्पशा टेनिस कारकीर्दीत पहिल्यांदाच एटीपी मास्टर्स 1000 दर्जाच्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली आहे.