वृत्तसंस्था/ पॅरीस
2023 च्या फ्रेंच ग्रँडस्लॅम पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत सर्बियाचा नोव्हॅक जोकोव्हिच, ब्रिटनचा कॅमेरुन नुरी, रशियाचा रुबलेव्ह यांनी तर महिला विभागात अमेरिकेची स्लोनी स्टिफेन्स, इटलीची सारा इराणी, झेकची मुचोव्हा यांनी विजयी सलामी दिली. मात्र प्लिसकोव्हा, सॅकेरी तसेच टिचमन यांचे आव्हान समाप्त झाले.
पुरुष एकेरीच्या सोमवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या फेरीतील सामन्यात सर्बियाच्या जोकोव्हिचने अमेरिकेच्या 24 वर्षीय कोव्हासेव्हिकचा 6-3, 6-2, 7-6 (7-1) असा पराभव करत विजयी सलामी दिली. जोकोव्हिच आता या स्पर्धेत विक्रमी 23 वे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे. दुसऱ्या एका सामन्यात ब्रिटनच्या कॅमेरुन नुरीने फ्रान्सच्या बेनोई पेरीचा 7-5, 4-6, 3-6, 6-1, 6-4 अशा पाच सेट्समधील लढतीत पराभव करत विजयी सलामी दिली. जोकोव्हिचचा दुसऱ्या फेरीतील सामना हंगेरीच्या फ्यूकसोव्हिक्सशी होणार आहे. रशियाच्या आंद्रे रुबलेव्हने विजयी सलामी देताना सर्बियाच्या डिजेरीवर 6-1, 3-6, 6-3, 6-4, फ्रान्सच्या लुकास पौलीने ऑस्ट्रेलियाच्या रोडीनोव्हचा 6-2, 6-4, 6-3, ऑस्ट्रेलियाच्या कुबलेरने अर्जेंटिनाच्या डायेझचा 1-6, 6-3, 6-4, 3-6, 6-1, असा पराभव करत दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. ग्रीसच्या सित्सिपेतने दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळविताना झेकच्या व्हॅसेलिचा 7-5, 6-3, 4-6, 7-6 (7-5), ऑस्ट्रेलियाच्या कोकीनाकिसने ब्रिटनच्या इव्हान्सचा 6-4, 6-4, 6-4 पराभव केला. अमेरिकेच्या सेबिस्टियन कोर्दाने अमेरिकेच्या मॅकेन्झी मॅकडोनाल्डचा 6-4, 7-5, 6-4 असा पराभव करत दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले.
महिलांच्या विभागात अमेरिकेच्या स्लोनी स्टिफेन्सने सोमवारी विजयी सलामी देताना 80 मिनिटांच्या कालावधीत झेकच्या कॅरोलीना प्लिसकोव्हाचा 6-0, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडला. अन्य एका सामन्यात इटलीच्या सारा इराणीने स्वीसच्या टीचमनचा 3-6, 6-4, 6-2, झेकच्या कॅरोलीना मुचोव्हाने ग्रीसच्या मारिया सॅकेरीचा 7-6 (7-5), 7-5, अर्जेंटिनाच्या नादिया पोडोरोस्काने फ्रान्सच्या पाँचेटचा 6-0, 6-2 असा फडशा पाडत पुढील फेरीत स्थान मिळविले. इटलीच्या कॅमिला जॉर्जीने फ्रान्सच्या अॅलिझी कॉर्नेटचा 6-3, 6-4, अमेरिकेच्या जेसिका पेगुलाने आपल्याच देशाच्या कॉलिन्सचा 6-4, 6-2 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.