जयशंकर यांचा कॅनडाला इशारा : हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचाही आरोप : लोकशाहीच्या नावाखाली राजदुतांना धमक्या
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
आपल्या सत्ताकारणासाठी कोणत्याही राजकीय शक्तीने दहशतवादाचा आधार घेतल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होते, असे प्रतिपादन भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी केले आहे. त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत बोलताना अप्रत्यक्षरित्या कॅनडाच्या धोरणांवर टीका केली. त्यानंतर बुधवारी त्यांनी पत्रकार परिषदेतही या धोक्याची जाणीव करुन दिली. कॅनडातील दहशतवादी भारतीय दुतावासाच्या अधिकाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देत होते, तेव्हा तो त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे, असे मानले जात होते. अशा धोरणांमुळे दहशतवाद्यांना अधिक बळ मिळते. प्रत्येक देशाने प्रत्येक अन्य देशाचे सार्वभौमत्व आणि भौगोलिक एकात्मता यांचे संरक्षण केले पाहिजे. आपले स्थानिक सत्ताकारण याच्या आड येऊ नेता कामा नये, असे आवाहनही जयशंकर यांनी केले. दहशतवादाशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संयुक्त राष्ट्र महासभेत संबोधित केल्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी परराष्ट्र संबंध परिषदेत चर्चेत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी त्यांनी पॅनडासोबतच्या तणावाव्यतिरिक्त चीन, रशिया आणि मणिपूर हिंसाचार या मुद्यांवर आपली भूमिका मांडली. पॅनडामध्ये फुटीरतावादी शक्ती, हिंसाचार आणि दहशतवाद्यांशी संबंधित गुन्ह्यांना प्रोत्साहन दिले जात असून असे प्रकार फोफावत असून असल्याचा आरोप जयशंकर यांनी केला. न्यूयॉर्कमध्ये निज्जरच्या हत्येवर उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवर परराष्ट्रमंत्र्यांनी चोख उत्तर दिले. पॅनडामध्ये आमच्या दुतावास अधिकाऱ्यांना घाबरवले जाते. धमक्याही दिल्या जातात. आमच्या वाणिज्य दुतावासांवर हल्ले केले जातात. लोकशाहीत असेच घडते असे सांगून त्याचे समर्थनही केले जाते. अशा घटना घडणे त्रासदायक असून त्याची गंभीर दखल भारताकडून घेतली जाणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. राजकीय कारणांमुळे पॅनडा अशा घटनांच्या बाबतीत अतिशय हलगर्जीपणा करत असल्याची चिंताही जयशंकर यांनी व्यक्त केली. भारताने पॅनडाला गुन्हे आणि दहशतवाद्यांबाबत बरीच माहिती दिली असून अनेक संशयितांच्या प्रत्यार्पणाची विनंती केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
निश्चित माहिती द्या…
कॅनडाने अद्याप निज्जर हत्या प्रकरणात निश्चित माहिती दिलेली नाही. आम्ही त्यांच्याकडे अशी माहिती मागितली आहे. तसेच अन्य देशांमध्ये कोणाची हत्या करण्याचे भारताने धोरण कधीच नव्हते आणि आताही नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कॅनडातील हत्येत भारताचा हात नाही. त्या देशाने आम्हाला निश्चित स्वरुपाची माहिती दिली आणि मोघमपणा टाळला तर आम्ही त्यासंबंधात पावले उचलण्याचा विचार करु शकतो, असेही प्रतिपादन जयशंकर यांनी केले.
भारताने आतापर्यंत पॅनडातून चालणाऱ्या संघटित गुन्हेगारी आणि त्याच्या नेत्यांबद्दल बरीच माहिती दिली आहे. कॅनडात आश्रय घेतलेल्या अनेक दहशतवादी नेत्यांची ओळख पटली आहे. त्याबाबतही कॅनडाला वेळोवेळी सर्व पुरावे देण्यात आले आहेत. निज्जरच्या हत्येबाबतही भारत सरकारचे धोरण आम्ही कॅनडाला सांगितले आहेत, असे ते पुढे म्हणाले.
कॅनडाकडेही काही विशिष्ट माहिती किंवा पुरावे असतील तर त्यांनी आम्हाला द्यावेत. संपूर्ण माहितीशिवाय कोणतेही पाऊल उचलता येत नाही. वास्तविक, निज्जर यांच्या हत्येच्या आरोपांबाबत पॅनडाने अद्याप कोणताही पुरावा दाखवलेला नाही. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान ट्रूडो यांनी आठवडाभरात सर्व पुरावे भारतासोबत शेअर केले जातील, असा शब्द दिला होता. मात्र, त्यांनी कोणतेही दस्तावेज किंवा माहिती आजमितीपर्यंत पुरवली नसल्याचा दावाही जयशंकर यांनी केला. दुसरीकडे, पॅनडाच्या आरोपांमागे ‘फाईव्ह आयज अलायन्स’च्या इंटेलिजन्स शेअरिंगच्या अहवालावर परराष्ट्र मंत्र्यांना कठोर शब्दात प्रत्युत्तर दिले. मी या अलायन्सचा भाग नाही आणि मी एफबीआयमध्येही नाही. तुम्ही चुकीच्या माणसाला प्रश्न विचारत आहात, असे जयशंकर म्हणाले.