शिवआरतीने दोडामार्गात आसमंत दुमदुमून गेला
दोडामार्ग – वार्ताहर
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘दोडामार्ग ते मुंबई’ या भव्य ‘शिवशौर्य यात्रेला आज दोडामार्ग शहरातून मोठ्या उत्साहात जल्लोषात सुरुवात झाली. विश्व हिंदू परिषद व बजरंग दल कोंकण प्रांत या दोहोंच्या संयुक्त विद्यमाने आयोजित झालेल्या या यात्रेमध्ये हजारोंनी शिवप्रेमी सहभागी झाले. ढोलताशांच्या गजरात शिवप्रतीमा व शिवरथाचे पूजन, दीपप्रज्वलन, शिवआरतीने आसमंत दुमदुमून गेला. यावेळी शिवरायांच्या प्रतिमेवर मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्ठी करण्यात आली. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण सहभागी झाले. शिवाय सावंतवाडी संस्थांनचे युवराज लखमराजे भोसले हे देखील सहभागी झाले होते.
आज सकाळी सात वाजता येथील सिद्धिविनायक मंदिरात मोठ्या संख्येने शिवप्रेमी जमा झाले. सुरुवातीला शिवप्रतीमेची विधिवत पूजा अर्चा, शिवरथाचे पूजन, अभिषेक आदी विधी खास पुरोहितांकडून संपन्न झाले. त्यानंतर ही यात्रा बजापेठेतील मुख्य चौकात दाखल झाली. मुख्य चौकातही या यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी तालुक्यातील प्रत्येक गावाच्या सरपंचांनी आणलेल्या झेंड्यांनी एक खास वाहनही सजविण्यात आले होते. यात्रेच्या सुरुवातीला यात्रा कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष विवेकानंद नाईक यांनी सर्वांचे स्वागत केले तर युवराज लखमराजे भोसले यांनी शिवरथाचे व शिवप्रतीमेचे पूजन, दीपप्रज्वलन आदी विधी केले. यावेळी व्यासपीठावर युवराज लखमराजे भोसले, विश्व हिंदू परिषद कोंकण प्रांत सहमंत्री अनिरुद्ध भावे, रत्नागिरी विभागाचे विभाग मंत्री विवेक वैद्य, यात्रेचे स्वागताध्यक्ष विवेकानंद नाईक, मातृशक्ती प्रमुख विनिता देसाई आदी होते. तर यात्रेचे पालक जयवंत आठलेकर, यात्राप्रमुख मनोज वझे, धार्मिक कार्यक्रम प्रमुख गुरुदास मणेरीकर, सभाप्रमुख मिलिंद नाईक, विशाल चव्हाण, निलेश साळगावकर, प्रचारप्रमुख भूषण सावंत, रामकृष्ण दळवी, निधी व यातायात प्रमुख रंगनाथ गवस, भोजन व्यवस्था प्रमुख श्रवणकुमार राजपुरोहित, यात्रामार्ग नियोजन प्रमुख संजय सावंत, सुरक्षा प्रमुख नीलकंठ फाटक, राकेश धरणे, कृष्णा नाईक अशी आहे.