फोंडा : स्वच्छता ही सेवा या केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्वच्छता सप्ताह अभियानातंर्गत फोंडा नगरपालिकेतर्फे रविवारी सकाळी सर्व पंधराही प्रभागांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. फोंड्याचे आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक, नगराध्यक्ष रितेश नाईक यांच्यासह इतर नगरसेवक, सरकारी अधिकारी, कर्मचारी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रमदान कऊन परिसरातील उघड्यावरील कचरा गोळा केला.
फोंडा बाजारपेठेला लागून असलेल्या अरबिंदो मार्ग परिसरात या स्वच्छता मोहीमेला सुऊवात करण्यात आली. शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी, आरोग्य व पालिका कर्मचाऱ्यांसह, शिक्षक व भाजपा कार्यकर्त्यांनी या स्वच्छता मोहीमेत सहभागी होऊन श्रमदान केले. अनिवासी भारतीय आयुक्त अॅङ नरेंद्र सावईकर, उपनगराध्यक्ष दीपा कोलवेकर, नगरसेवक विश्वनाथ दळवी, आनंद नाईक, गिताली तळावलीकर, ज्योती नाईक, शौनक बोरकर यांच्यासह अन्य मान्यवरांनी स्वच्छता कार्यक्रमात सहभाग दर्शविला. स्वच्छतेचा संबंध आपल्या आरोग्याशी आहे. आपले घर स्वच्छ ठेवतानाच सभोवतालचा परिसरा स्वच्छ ठेवणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. बाजार परिसर व अन्य सार्वजनिक ठिकाणांबरोबरच नदी नाल्यांचे प्रदूषण थांबविणे हे प्रत्येक नागरिकांच्या हाती आहे. स्वच्छतेबाबात जागृत होऊन जबाबदारीने वागताना फोंडा शहर स्वच्छ, सुंदर व रोगमुक्त ठेवण्याचे आवाहन मंत्री रवी नाईक यांनी यावेळी बोलताना केले.
नगराध्यक्ष रितेश नाईक म्हणाले, फोंडा शहर स्वच्छ व कचरामुक्त ठेवण्यासाठी फोंडा पालिका कसोसिने प्रयत्न करीत आहे. स्वच्छतेची सुऊवात स्वत:पासून होते. त्याला सामुहिक प्रयत्नांची जोड मिळाल्यास त्यातून संपूर्ण परिसर स्वच्छ व निरोगी राहण्यास मदत होते. याच विचारातून केंद्रातील मोदी सरकारने गांधी जयंतीनिमित्त देशभरात स्वच्छता सप्ताह जाहीर केला आहे. अशा उपक्रमांमधून प्रेरणा घेत फोंडा शहर स्वच्छ व कचरामुक्त ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. या उपक्रमातंर्गत श्रमदानातून फोंडा शहरातील विविध प्रभागांमधून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व अन्य कचरा गोळा करण्यात आला.