दिल्ली पोलिसांची मुंबई पोलिसांना विनंती : सोशल मीडियावर मुंबई व दिल्ली पोलिसांची जुगलबंदी
वृत्तसंस्था /मुंबई
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने बुधवारी न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात 7 बळी घेत टीम इंडियाच्या विजयात महत्वपूर्ण भूमिका बजावली. त्याच्या गोलंदाजीच्या जोरावर भारताने किवी संघाचा 70 धावांनी पराभव केला. दरम्यान, सामन्यानंतर शमीवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच आता शमीच्या या घातक गोलंदाजीनंतर दिल्ली पोलिस आणि मुंबई पोलिसांमध्ये विनोदी ट्विटरवॉर रंगले आहे. दोघांनी एक्सवर मजेशीर ट्विट केली आहेत. हे ट्वीट प्रचंड लोकप्रिय ठरले आहेत. न्यूझीलंडविरुद्धची गोलंदाजी पाहून दिल्ली पोलिसांनी मुंबई पोलिसांना उद्देशून बुधवारी एक ट्विट केले. या ट्विटमध्ये दिल्ली पोलिसांनी लिहिले की, ‘आम्हाला आशा आहे की, आज रात्री न्यूझीलंड संघावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलीस मोहम्मद शमीविरुद्ध कोणतीही कारवाई करणार नाहीत.’ दिल्ली पोलिसांच्या या ट्विटला मुंबई पोलिसांनी तत्काळ मजेशीर उत्तर दिले आणि लिहिले, ‘तुम्ही असंख्य लोकांची मने जिंकण्याच्या गंभीर आरोपांचा उल्लेख करण्यात आणि काही सहआरोपींची यादी सादर करण्यात अपयशी ठरला आहात.’ दरम्यान, दोन पोलिस दलांमधील हे मजेशीर ट्विट जोरदार व्हायरल झाले असून चाहत्यांनी यावर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.