दैनंदिन जीवनामध्ये इतरांबाबतचा द्वेषमूलक दृष्टीकोन वा मत्सरी वृत्ती हृदयासाठी अत्यंत घातक असल्याचा जयपूरमधील हृदयरोगतज्ञांच्या परिषदेत काढण्यात आलेला निष्कर्ष धक्कादायकच म्हणायला हवा. तणाव हा आज मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आर्थिक, कौटुंबिक चिंता ही तणावाची प्रमुख कारणे मानली जातात. मागच्या काही वर्षांत माणसाच्या जीवनशैलीत प्रचंड बदल झाले आहेत. जगण्याला बुलेट ट्रेनची गती प्राप्त झाल्याने तणावाचे ओझेही वाढल्याचे पहायला मिळते. किंबहुना, काही तणाव हे स्वनिर्मित असल्याचेही दिसून येते. मत्सर वा द्वेषभावनेतून उत्पन्न होणारे ताणतणाव हा त्यातलाच प्रकार. इतरांविषयी सतत द्वेषभाव बाळगणे, एखाद्यास कमी लेखणे किंवा त्याच्या पुढे जाण्याचा विचार करणे, यातून संबंधित व्यक्तीच्या शरीरात एपिनेफ्रिन, नॉरपेनफ्रिन आणि कोर्टिसोलसारखे नकारात्मक हार्मोन्स स्रवले जातात व त्याचा परिणाम थेट हृदयावर होत असल्याची मांडणीही या परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. ती गंभीरपणे घेणे, हे प्रत्येकासाठीच हितावह होय. भारतीय संस्कृतीने सातत्याने जगाला आपल्या विचारांतून नवी दिशा देण्याचे काम केले. अनेक संत महंतांनीही माणसाने कसे जगावे, विचारांमध्ये शुद्धता कशी आणावी, याविषयी सखोल विवेचन केले आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे आपल्या संस्कृतीत माणसाचे सहा शत्रू मानले जातात. हे शत्रू आपल्या स्वत:सह सगळ्यांसाठीच बाधक असतात. राग, लोभ वा मत्सरातून माणसाचे वैचारिक व नैतिक अध:पतन झपाट्याने होत जाते. एका अर्थी संबंधित व्यक्ती मानसिक रोगाने पछाडते. त्यामुळे संवेदनशीलता, प्रेम, कऊणा, माणुसकी अशा उच्चतम गुणांपासून दुरावत अशी मत्सरग्रस्त व्यक्ती तमोगुणांच्या आहारी जाते. यातून मानसिक व शारीरिक अशा दोन्ही पातळ्यांवर त्या व्यक्तीचे नुकसान होते, हेच परिषदेतील निष्कर्ष सांगतात. म्हणूनच मनाच्या आरोग्याकडेही प्रत्येकाने लक्ष द्यायला हवे. देशात दरवर्षी जवळपास 1.86 कोटी लोक हृदयविकाराचे बळी ठरतात. तर भारतातील 25 टक्के लोक हे हृदयविकारामुळे मृत्युमुखी पडत असल्याचे सांगण्यात येते. यातूनच हृदयरोग किती जीवघेणा आहे, हे लक्षात येते. व्यायामाचा अभाव, स्थूलत्व, शरीरातील चरबीचे प्रमाण वाढणे, मधुमेह, रक्तदाबासारखे विकार, व्यसनाधिनता, चुकीची जीवनशैली, स्वास्थ्याचा अभाव, हायपरटेन्शन ही या आजाराची काही कारणे आहेत. ती पाहता शरीर व मनाची सांगड कशी घालता येईल, याचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. कोणत्याही आजाराचे मूळ हे मनात असते, असेही वैद्यकीय क्षेत्र सांगते. हृदयाच्या बाबतीत हे तंतोतंत लागू ठरावे. म्हणूनच त्यातला मथितार्थ समजून घेतला पाहिजे. जगद्गुरू तुकाराम महाराज यांची अभंगगाथेवर जगभर अभ्यास होत आहे. तुकोबांचे अनेक अभंग माणूसपणावर प्रकाश टाकतात. कुणाही जीवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वर । पूजनाचे ।। तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दु:ख जीव । भोग पावे ।। या ओवीत मानवी जीवनाचे सारच सामावले आहे. सुख आणि दु:ख हा जगण्याचा एक भाग आहे. म्हणून सुख दु:खाच्या कठीण प्रसंगांना आपण सामोरे जायला हवे. त्याचबरोबर कुणाबद्दलही आपल्या मनात द्वेषभाव येता कामा नये, हे परमेश्वराच्या पूजनाचे खरे रहस्यही त्यांनी सांगितले आहे. त्यातील मर्म आपण जाणून घेतले, तर आपल्या मनाभोवतीची काजळी निश्चितच दूर होऊ शकते. समर्थ रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक प्रसिद्ध आहेत. यात समर्थांनी मन कसे असावे, याविषयी दिलेला संदेश आजही आपल्या सर्वांसाठी अनुकरणीय ठरतो. मना वासना दुष्ट कामा नये रे । मना वासना पापबुद्धी नको रे ।। असे समर्थ सांगतात. याशिवाय लोभ, मत्सरापासून आपल्या मनाला दूर ठेवण्याचा सल्लाही समर्थ देतात. आपले हृदय निरोगी ठेवायचे असेल, तर मनाचे श्लोक अंगीकारावे लागतील. महात्मा गांधी यांना आपण राष्ट्रपिता संबोधतो. गांधीजींनी आपल्या सबंध आयुष्यात वैचारिक शुद्धतेला अतिशय महत्त्व दिले. सत्य, अहिंसा या तत्त्वांवर गांधींची प्रगाढ श्रद्धा होती. माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे, इतरांचाही विचार करावा, हा गांधी विचारांचा गाभा आहे. म्हणूनच ‘मी’ आणि माझे याभोवतीच स्वत:ला चौकटबंद करण्यापासून आपण रोखले पाहिजे. त्याऐवजी एकमेकांमध्ये संवाद कसा ठेवता येईल, मैत्रीचे नाते कसे निर्माण करता येईल, यावर भर असायला हवा. आजच्या विज्ञानयुगात आपण एकापेक्षा एक शिखरे सर केली असली, तरी माणसामाणसांतील संवाद हरवत चालल्याचे पहायला मिळते. माणूस असा यंत्रवत होणे, सामाजिकदृष्ट्या मागे जाण्यासारखेच आहे. याउलट परस्परांमधील संवाद वाढला, तर ताणतणाव नक्कीच हलके होऊ शकतील. मागील दहा वर्षांत नोकरदार स्त्रियांमधील हृदयरोगाचे प्रमाण वाढत आहे. नोकरीतील तणाव, कामाचा दबाव यामुळे महिलांमध्ये कमी वयातच म्हणजे रजोनिवृत्तीपूर्वीच हृदयविकाराचा धोका 21 टक्क्यांनी वाढत असल्याचे निरीक्षणही नोंदविण्यात आले आहे. पुऊषांच्या खांद्याला खांदा लावून आज महिला नोकरीधंद्यात स्थिरावल्या असल्या, तरी बव्हंशी महिलांना घरातील जबाबदाऱ्यांचा भारही सोसावा लागतो. दोन्ही आघाड्यांवर लढताना या महिलांना बरीच कसरत करावी लागते. या साऱ्याचे त्यांच्या शरीरावर, मनावर काय आघात होत असतील, याची कल्पनाच केलेली बरी. हे पाहता महिलांनी आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्याकडे अधिकचे लक्ष द्यावे. त्याचबरोबर कुटुंबानेही त्यांना याकरिता समर्थ साथ द्यावी. जीवनशैली हा आज परवलीचा शब्द बनला आहे. नियमित व्यायाम व योग्य व वेळेत आहार, याचा अवलंब केला, तर सकारात्मक चित्र तयार होऊ शकते. त्याचबरोबर फास्टफूड व व्यसनाधिनतेपासून दूर राहण्याचा संकल्पही हवा. शरीराबरोबरच मनाच्या आरोग्यासाठी योग, ध्यानधारणा करणेही हितावह. मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण।। या संतवचनाचा प्रत्येकाने अंगीकार करणे, ही तर काळाची गरजच होय.
Previous Articleमाझ्या अनन्य भक्ताचे मी संरक्षण करत असतो
Next Article पॅराग्लायडिंग करताना केला नाश्ता
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.
Related Posts
Add A Comment