महाराष्ट्रासह वेगवेगळ्या भागातील गणेश विसर्जन मिरवणूक सोहळा काही अपवाद वगळता शांततेत व उत्साही वातावरणात पार पडणे, ही निश्चितच आनंदाची बाब होय. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाचे आगमन झाल्यानंतरचे दहा दिवस हे अत्यंत भारावलेले असतात. हे दहा दिवस कसे जातात, हे कुणालाच कळत नाही. विसर्जनाचा दिवस काहीसा भावूक, हळवा. तथापि, ‘पुढच्या वर्षी लवकर या,’चा घोष करीत जल्लोषात गणरायाला निरोप दिला जातो. अनंत चतुर्दशीच्या या दिवशी गणरायाला निरोप देण्यासाठी पुण्या-मुंबईसह वेगवेगळ्या शहरांमध्ये भव्यदिव्य मिरवणुका निघतात. दिवसेंदिवस या मिरवणुकांची व्याप्ती वाढत असल्याचे पहायला मिळते. विक्रमी वेळेपर्यंत चालणाऱ्या या मिरवणुका हे गणेशभक्तांचे खास आकर्षण असते. यंदा पाऊस असूनही मिरवणुकीतील उत्साहावर त्याचा यत्किंचितही परिणाम झालेला दिसला नाही. पुण्यात मागच्या चार-पाच दिवसांपासून दमदार पाऊस होत आहे. मिरवणुकीच्या दिवशीही पुण्याला पावसाने चांगलाच दणका दिला. मात्र, भर पावसातही ढोल ताशांचा गजर, कार्यकर्त्यांनी धरलेला ठेका नि गणेशभक्तांची गर्दी याचे दर्शन ठायीठायी बघायला मिळाले. गणेशोत्सवाचे वैशिष्ट्या ते हेच. कितीही विघ्ने आली, तरी लाडक्या बाप्पावर भक्तांकडून प्रेमाची बरसात होतच राहते. विसर्जन मिरवणूक वेळेत पार पडावी, यासाठी प्रशासनाकडून दरवर्षी प्रयत्न होतात. त्यात काही प्रमाणात यश मिळत असले, तरी अजून बराच पल्ला गाठायचा आहे. पुणे, मुंबईचा विचार केला, तर तेथील मिरवणुका 28 तासांवर चाललेल्या दिसतात. इतर शहरांतही कमी अधिक प्रमाणात हेच चित्र पहायला मिळते. म्हणजेच मिरवणूक संपण्यास दुसऱ्या दिवशीची दुपार वा संध्याकाळ उजाडते. हे चित्र बदलायचे असेल, तर मंडळे, मंडळांचे कार्यकर्ते, प्रशासन व नागरिक अशा सर्वांना एकत्रित प्रयत्न करावे लागतील. अर्थात त्यादृष्टीने काही मंडळांकडून सकारात्मक पावले पडत आहेत. पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ मंडळाच्या गणपतीचा यासंदर्भात आवर्जून उल्लेख करावयास हवा. लाखो दिव्यांनी उजळणारा तेजोमय रथ व त्यातील दगडूशेठ गणपतीची मूर्ती हे पुण्याच्या वैभवशाली मिरवणुकीतील प्रमुख आकर्षण मानण्यात येते. दरवर्षी मध्यरात्रीच्या सुमारास हा गणपती मार्गस्थ होतो व पहाटे सहा ते सातच्या सुमारास गणरायाचे विसर्जन होते. यादरम्यान दगडूशेठ व अन्य प्रमुख मंडळांच्या गणरायाच्या दर्शनासाठी पुण्यात अक्षरश: गर्दीचा महापूर लोटलेला असतो. यंदा मात्र मिरवणूक वेळेत पार पडण्यासाठी हा पायंडा मोडत दुपारी चारलाच दगडूशेठ मार्गस्थ झाला व रात्री नऊपर्यंत विसर्जनही पार पडले. हे नक्कीच एक क्रांतिकारक पाऊल म्हणता येईल. याबद्दल दगडूशेठ ट्रस्टच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कौतुक करावे तेवढेच थोडे आहे. अन्य प्रमुख मंडळांनी आम्हाला प्रॅक्टिकली इतक्या लवकर निघणे शक्य होणार नसल्याचे सांगितले होते. किंबहुना, प्रत्येकाने सकारात्मक दृष्टीकोन ठेवत जमेल त्या पद्धतीने लवकर निघण्याचा प्रयत्न केला, तर मिरवणुकीचे तास कमी होऊ शकतील. भविष्यात दगडूशेठचा आदर्श इतर मंडळे घेतील, अशी अपेक्षा आहे. मुंबईतील विसर्जन मिरवणूक, लालबागच्या राजासह इतर मंडळांच्या गणपतींना निरोप देण्यासाठी होणारी भक्तांची अलोट गर्दी म्हणजे भक्तीचा महासागरच म्हणता येईल. यंदाही या महाकाय लाटा अनुभवता आल्या. मुंबईत चौपाट्या, तलाव व कृत्रिम हौदांमध्ये गणरायाचे विसर्जन होते. पुण्यासह वेगवेगळ्या शहरातही नद्या, तलाव वा कृत्रिम हौदात विसर्जन केले जाते. काहींचा नद्या वा तलावातच विसर्जन करण्याचा अट्टहास असला, तरी कृत्रिम तलावात विसर्जन करण्याकडे नागरिकांचा कल वाढत असल्याचे दिसून येते. हे चांगले लक्षण होय. त्याबरोबर शाडूच्या मूर्तींना प्राधान्य देत घरीच विसर्जन करण्यास काही गणेशभक्त पसंत देत असल्याचे दिसते. हे चित्र सुखावह होय. मागच्या काही वर्षांपासून पर्यावरणाबाबत जागृती वाढते आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या दिशेनेही पावले पडताना दिसतात. अर्थात या स्तरावर प्रगतीस आणखी बराच वाव आहे. विसर्जनाबरोबरच निर्माल्याबाबत लोकांनी काळजी घेतली, तर बऱ्याच गोष्टी सुकर होतील. गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देत असताना आपल्या समाजधुरिणांच्या काही अपेक्षा होत्या. त्यातल्या काही सफल झाल्या असल्या, तरी उत्सवाला मिळणारे दणदणाटी वळण हे काही चांगले लक्षण नव्हे. गणेशोत्सवच नव्हे, तर एकूण सर्वच उत्सव व महापुऊषांच्या जयंत्यांमधील डिजेचा कर्णकर्कश आवाज ही एक समस्याच होऊन बसली आहे. कानठळ्या बसविणाऱ्या या आवाजाने काही शहरांमधील नागरिकांना जीव गमवावा लागल्याचीही उदाहरणे पुढे आली आहेत. त्यामुळे डिजेला मर्यादा आणण्याच्या दृष्टीकोनातून आगामी काळात जोरकसपणे प्रयत्न करावे लागतील. पारंपरिक वाद्यांचा पर्याय चांगला असला, तरी पथक व त्यातील सदस्यांचे काटेकोर बंधन प्रत्येकास असायला हवे. वेगवेगळ्या दुर्घटनांमुळे विसर्जन मिरवणुकीला दरवर्षी गालबोट लागते. नदी, तलाव वा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना यंदाही घडल्या आहेत. पिंपरीत तर मिरवणुकीच्या वेळी एका चिमुरड्याचा हौदात पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी खबरदारी घेतली पाहिजे. मुख्य म्हणजे मंडळे, कार्यकर्ते, नागरिक व प्रशासनाने याकरिता सामूहिकपणे प्रयत्न करायला हवेत. मंडळामडंळांमधील वाद योग्य नव्हेत. हा एकीचा उत्सव आहे, बेकीचा नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. सण, उत्सव व त्यातील सामंजस्य भारतीय संस्कृतीची परंपराच आहे. यंदा अनंत चतुर्दशी व ईद एकाच दिवशी आल्याने ईद दुसऱ्या दिवशी साजरी करण्याचे मुस्लीम समुदायाने जाहीर केले. त्यानंतर शुक्रवारी ईदची सुटी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली. दोन्ही उत्सव आनंदाने साजरे होणे, हे आनंददायीच. आता प्रतीक्षा असेल, ती पुढच्या वर्षीची.