मल्हारपेठ ता. पन्हाळ येथील घटना
कोल्हापूर प्रतिनिधी
पत्नीला आंघोळीसाठी अगोदर पाणी दिले नाही म्हणून सुनेवार वार करुन तिचा खून आणि दोन नातवांना जखमी केल्याच्या गुन्ह्य़ात सासऱ्याला जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.डी.शेळके यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. पांडुरंग दशरथ सातपुते (वय 74 रा.मल्हारपेठ ता पन्हाळा ) असे आरोपीचे नाव आहे. सरकारी पक्षाच्या वतीने ऍड एस.एस.इंगळे यांनी काम पाहिले.
पांडुरंग सातपुते आणि मृत शुभांगी रमेश सातपुते हे नात्याने सासरे व सून आहेत. 14 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी शुभांगी यांनी त्यांच्या सासूला अगोदर आंघोळीसाठी पाणी दिले नाही. या कारणावरुन चिडून पांडुरंग सातपुते यांने सून शुभांगी यांच्यावर वार केले. डोक्यात, हातावर व पायावर गंभीर वार झाल्याने शुभांगी यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर पांडुरंग सातपुते यांने नातू मयुरेश व नात कनिष्का यांच्या डोक्यात लोखंडी पारळीने वार करुन ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी शुभांगीचे पती रमेश सातपुते यांनी कळे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक एम.जी.देसाई यांनी या गुन्हय़ाचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. बुधवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश शेळके यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. यावेळी सरकारी वकील सुजाता इंगळे यांनी एकूण 12 साक्षीदार तपासले. फिर्यादी रमेश सातपुते आणि जखमी मयुरेश व कनिष्का यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. सरकारी वकील इंगळे यांचा युक्तिवाद ग्राहय़ धरुन न्यायालयाने पांडुरंग सातपुते यांना सूनेच्या खूनप्रकरणी जन्मठेप तर नातवांना जखमी केल्याप्रकरणी दहा वर्षाची शिक्षा व पाच हजार रुपये दंड ठोठावला. पोलीस कॉन्स्टेबल रमेश वसावे,पैरवी अधिकारी आर.आर.यादव,सहायक पोलीस उपनिरीक्षक शाम बुचडे यांनी यासाठी मदत केली.