काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व सतेज पाटील समर्थकांनी केली फटाक्यांची आतषबाजी
आजरा प्रतिनिधी
आजऱ्याची लेक आणि कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी तब्बल 19 हजारांच्या मताधिक्याने विजयी झाल्या. त्यांच्या विजयाची बातमी समजताच काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, पालकमंत्री सतेज पाटील समर्थक तसेच आजरेकरांनी जल्लोष केला. येथील संभाजी चौकात फटाक्यांची आतषबाजी करून पेढे वाटले.
कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त जागेवर काँग्रेसने त्यांची पत्नी आजऱयाची लेक श्रीमती जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली. जाधव यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर आजरेकरांनी लेकीला विजयी करण्यासाठी कोल्हापूरस्थित आजरेकर, नातेवाईक यांच्याशी संपर्क करून श्रीमती जाधव यांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेते मंडळींनी थेट कोल्हापूर येथे जाऊन प्रचारात सहभाग घेतला होता. श्रीमती जाधव विजयी होणार असा दावाही आजरेकरांनी केला होता. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक अभिषेक शिंपी, किरण कांबळे, अमित खेडेकर यांच्यासह कार्यकर्त्यांची टीम गेले कित्येक दिवस जाधव यांच्या प्रचारात सहभागी झाली होती.
शनिवारी सकाळी मतमोजणीला प्रारंभ झाल्यानंतर समस्त आजरेकर सातत्याने निकालाच्या आकडेवारीची माहिती मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले. जाधव यांचे सातत्याने वाढणारे मताधिक्य पाहून येथील संभाजी चौकात आजरेकरांनी विजयाच्या घोषाणा देण्यास सुरूवात केली. तर जाधव यांचा विजय होताच चौकात फटाक्यांची आतषबाजी करून पेढे वाटले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, काँग्रेसचे नौशाद बुड्डेखान, शिवसेनेचे शहर प्रमुख ओंकार माद्याळकर यांच्यासह टीम सतेजचे रवींद्र भाटले यांच्यासह आजरेकर उपस्थित होते.