ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुंबईतील प्रसिद्ध जे. जे रुग्णालयातील नेत्ररोग विभागाचे वरिष्ठ प्रमुख डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह 9 डॉक्टरांचा राजीनामा
सरकारने मंजूर केला आहे. जे. जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या तक्रारीनंतर त्यांनी राजीनामा दिला होता.
जे.जे रुग्णालयात नेत्रविकार विभागात डॉक्टर, प्राध्यापक, विभाग प्रमुख हे विद्यार्थ्यांना त्रास देत असून, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, अशी तक्रार मार्डच्या निवासी डॉक्टरांनी केली होती. नेत्ररोग चिकत्साविभागानं याची चौकशी करुन स्पष्टीकरण दिले. मात्र, त्याने मार्डच्या निवासी डॉक्टरांचे समाधान झालं नाही. त्यांनी आंदोलन छेडले. त्यामुळं उद्वीग्न होऊन लहाने, पारेख यांच्यासह 9 डॉक्टरांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. हे राजीनामे आज सरकारने मंजूर केले. तसेच नवीन नियुक्त्या करण्याचे आदेशही दिले.
डॉ. लहाने यांच्यावर शस्त्रक्रिया चोरल्याचाही आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. त्यावर डॉ. लहाने म्हणाले होते की, मी 1984 मध्ये या विभागात रुजू झालो. त्यावेळी येथे डोळय़ांच्या उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या ही 30 होती. ती संख्या सध्या 400 वर पोहचली आहे. यामागे या विभागात करण्यात आलेले वेगवेगळे प्रयोग आणि उपचारांचा दर्जा आहे. मागील 30 वर्षात आम्ही अनेक डॉक्टरांना घडवूनसुद्धा आमच्यावर शस्त्रक्रिया चोरल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. हे अत्यंत वेदनादायक आहे. त्यामुळे आम्ही राजीनामे दिले.
ज्या सेवा जे.जे रुग्णालयात माझ्यासोबतच्या सहकाऱयाकडून दिल्या जातात. त्या इतर कुठेही दिल्या जात नाहीत. 22 मे ला निवासी डॉक्टरांनी तक्रार केली. त्याची एकतर्फी चौकशी करण्यात आली. यावेळी आम्ही अशोक आनंद वगळता कुणाचीही या चौकशी समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती केली तर आम्हाला काहीही हरकत नसल्याचे सांगितले होते. पण आमचं म्हणणं ऐकून न घेता चौकशी सुरू ठेवली. त्यामुळे आम्ही राजीनामा दिला. आता जे. जे रुग्णालय आणि आमचा संबंध संपला असेही त्यांनी म्हटले होते.