दोन महिने उलटले तरी मनपा अधिकाऱयांचा कानाडोळा : रस्त्यावर चरी निर्माण झाल्याने वाहनधारकांना अडचण
प्रतिनिधी /बेळगाव
एस. पी. ऑफिस रोड ते रामनगरला जाणाऱया रस्त्यावरील डेनेज चेंबरची समस्या सातत्याने निर्माण होत होती. त्यामुळे डेनेज वाहिन्या बदलण्यात आल्या आहेत. पण डेनेज वाहिन्या बदलून दोन महिने उलटले तरी रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. परिणामी या ठिकाणी अपघात घडत आहेत. महापालिका कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या समस्येकडे मनपा अधिकाऱयांनी कानाडोळा केला असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
महापालिका कार्यालयाच्या मागील बाजुला असलेल्या मराठा मंडळ कॉलेज रोडवरील रस्ता खराब झाला असून दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. मुख्य रस्त्यावर डेनेज चेंबर तुंबल्याने सातत्याने सांडपाणी वाहत होते. ही समस्या गेल्या कित्येक महिन्यांपासून उद्भवत होती. महापालिकेकडे तक्रार केल्यानंतर तात्पुरती दुरुस्ती करण्यात येत होती. पण डेनेज समस्येचे निवारण झाले नाही. त्यामुळे येथील डेनेज वाहिन्या बदलल्या आहेत. पूर्ण डेनेज वाहिन्या नवीन घालण्यात आल्या आहेत. डेनेज वाहिन्या बदलण्याचे काम पूर्ण करून दोन महिने उलटले मात्र रस्त्याची दुरुस्ती केली नाही. रस्त्यावर चरी निर्माण झाल्या असून पावसामुळे पाणी साचत आहे. तसेच ठिकठिकाणी बांधलेले डेनेज चेंबर वाहतुकीस अडथळा ठरत आहेत.
दुरुस्ती तातडीने करण्याची मागणी
महापालिका कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या समस्येकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. या ठिकाणी चरीमुळे दुचाकी वाहने घसरत असल्याने अपघात होत आहेत. परिसरात कॉलेज व शाळा तसेच खासगी रूग्णालये असल्याने रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. परिणामी वाहनधारकांना हा रस्ता धोकादायक बनला आहे. या रस्त्याची दुरूस्ती तातडीने करण्यात यावी अशी मागणी होत आहे.